n लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : आधी एलआरटी त्यानंतर पुन्हा मेट्रो आणि आता पुन्हा मेट्रोचा खर्च अधिक असल्याचा साक्षात्कार उशिराने पालिकेला झाला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसलेल्या आणि पुरेशी प्रवासी संख्या नसल्याने केंद्राच्या सूचनेनंतर अंतर्गत मेट्रोचा प्रकल्प महापालिकेने गुंडाळला आहे, परंतु या कामासाठी नेमलेल्या सल्लागारावर कोट्यवधींची उधळपट्टीही वाया गेली आहे. त्यानंतर, आता याच मार्गावर एलआरटी (लाइट रेल ट्रान्झिस्ट)चा प्रकल्प पुढे आणला आहे. यासाठी सात हजार १६५ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून, याबाबतचा प्रस्ताव १८ डिसेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.अंतर्गत मेट्रोऐवजी हा पर्याय निश्चित केल्याने तब्बल ५ हजार ९३० कोटींची बचत होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांच्या काळात एलआरटीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, त्यानंतर आयुक्तपदी आलेल्या संजीव जयस्वाल यांनी एलआरटीऐवजी कोट्यवधींचा खर्च करून अंतर्गत मेट्रोचा प्रस्ताव तयार केला होता. ठाण्यातून मुख्य मेट्रो लाइन ही हायवेवरून जाणार असल्याने या मुख्य मेट्रोपर्यंत प्रवाशांना जाता यावे, यासाठी महापालिकेने अंतर्गत मेट्रोचे प्लॅनिंग केले होते. त्यानुसार, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्याला महासभेची मान्यता घेतल्यानंतर, तो राज्य शासन आणि पुढे केंद्राच्या मान्यतेसाठी पाठविला होता, परंतु केंद्राने हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे सांगून त्याऐवजी व्यवहार्य ठरेल, असा दुसरा पर्याय पुढे आणावा, अशा सूचना केल्या. त्यानुसार, महापालिकेने पुन्हा महामेट्रोच्या मदतीने एलआरटीचा पर्याय पुढे आणला आहे.असे केले जाणार नियोजनपूर्वी प्रस्तावित केलेल्या मेट्रोच्या अलाइनमेंटमध्ये बदल न करता पूर्वीच्याच डीपीआरमध्ये सुचवल्याप्रमाणे अलाइनमेंट कायम ठेवून अंतर्गत मेट्रोच्या ऐवजी एलआरटी प्रकल्प राबविण्याबाबत महामेट्रोचा अहवाल मार्च २०२० मध्ये मिळाला. अंतर्गत भूसंपादन आणि पुनर्वसनाचे काम महापालिका करणार असून आणि मेट्रो लाइनची जास्त अलाइनमेंट ही डीपी रोडवर असल्याने भूसंपादन व पुनर्वसनाचा एक हजार ५२७ कोटींचा खर्चाचा बोजा थेट या प्रकल्पावर पडणार नसल्याने ही या प्रकल्पाची जमेची बाजू आहे. यासंदर्भातील प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला असून लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.एलआरटीमध्ये २२ स्थानकांचा समावेशमेट्रोप्रमाणे एलआरटीदेखील सुरुवातीचे तीन किमी भूमिगत व पुढे एलिव्हेटेड पद्धतीने धावणार आहे. २९ किमीचा मार्ग असणार असून यामध्ये २२ स्थानके असणार आहेत. तर, एका वेळेस ५०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता यामध्ये असणार असून याचा वेग मेट्रोपेक्षा २० टक्के कमी असणार असून ठाणेकरांना सुखकर प्रवासाची हमी दिली जाणार आहे. अंतर्गत मेट्रोसाठी सुमारे १३ हजार कोटी ९५ लाखांचा खर्च अपेक्षित होता. परंतु, आता एलआरटीसाठी तो सात हजार ९३० कोटींपर्यंतच असल्याने तब्बल ५ हजार ९३० कोटींची बचत होणार आहे.
ठाण्यात पुन्हा एलआरटीचा घाट; अंतर्गत मेट्रो गुंडाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 12:59 AM