भार्इंदर : अनेक वर्षापासून घोडबंदर किल्ल्याच्या डागडुजीसह त्याच्या भोवतालचा परिसर पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पावसळ््यापूर्वी महसूल विभागाच्या अखत्यारितील जागा पर्यटन विकासासाठी पालिकेकडे हस्तांतरीत होणार आहे.किल्याची सध्या दुरवस्था झाली आहे. ती थांबविण्यासाठी एमटीडीसीमार्फत अनेकदा किल्याच्या डागडुजीला सुरुवात झाली. परंतु, कंत्राटदाराने किल्याच्या मूळ बांधकामालाच धक्का लावल्याने ते काम बंद करण्यात आले. सध्या हा किल्ला डागडुजीच्या प्रतीक्षेत आहे. किल्ला परिसरात असलेली सुमारे चार हजार चौरस मीटर जागा पालिकेने पर्यटन विकासासाठी आरक्षित केली आहे. त्या जागेवरील विकासासाठी एमटीडीसीची नियोजन प्राधिकरण म्हणून पालिकेकडूनच नियुक्ती केली आहे. या जागेजवळच महसूल विभागाच्या अखत्यारितील सुमारे पाच एकर जागा पालिकेने विकास आराखड्यानुसार नागरी सुविधांसाठी आरक्षित केली आहे. महसूल विभागाची जागा पालिकेला पर्यटन विकासासाठी मिळावी, यासाठी सरनाईक यांनी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. त्याची दखल घेत जुलै २०१४ मध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी पी. वेलारासू व तत्कालिन पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी किल्ला परिसराची पाहणी केली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विकासकरिता १ कोटी देण्याचे मान्य केले. पालिकेकडूनही विकासाच्या खर्चाला हातभार लावला जाईल, असे आश्वासन तत्कालिन आयुक्तांनी दिले. यंदाच्या पालिका अंदाजपत्रकात किल्ला परिसराच्या सुशोभीकरणासाठी २ कोटींची तरतूद केली असून पुढीलवर्षीच्या अंदाजपत्रकातही तितकीच तरतूद करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे २३ नोव्हेंबर २०१६ झालेल्या बैठकीत महसूल विभागाची ५ एकर जागा सरकारी नियमानुसार पालिकेला विकासासाठी हस्तांतरीत करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. एमटीडीसीने महसूल विभागाकडील जागा पालिकेकडे हस्तांतरीत करण्यासाठी ७ फेब्रुवारीला प्रधान सचिवांशी पत्रव्यवहार केला. पावसाळ्यापूर्वी ती जागा एमटीडीसीच्या माध्यमातून पालिकेकडे हस्तांतरीत होणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणूनही याचा विकास होणे शक्य आहे. (प्रतिनिधी)
घोडबंदर किल्ल्याचा परिसर कात टाकणार
By admin | Published: February 15, 2017 4:34 AM