ठाणे : घोडबंदरचा पाणी प्रश्न मागील काही दिवसापासून चांगलाच गाजत आहे. घोडबंदरला १० दशलक्ष लीटर पाणी वाढवून देण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. परंतु केवळ पाच एमएलडी पाणी हे पुरेसे नसून घोडबंदरला १०० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यानुसार सुर्या धरणातून ठाण्याला १०० दशलक्ष लीटर पाणी मिळाले तर भविष्यातील पाण्याची तहान भागविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
घोडबंदर भागाची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या भागाला वाढीव १० दशलक्ष लीटर पाणी द्यावे अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यावर सरनाईक यांना छेडले असता, संजय केळकर आणि माझा मतदार संघ हा लागूनच आहे. त्यामुळे संपूर्ण घोडबंदरला पाणी टंचाई ही आजही कायम असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांचा आणि माझा पाण्या संदर्भातील प्रश्न हा एकच आहे, त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण आहे, असे नाही.
घोडबंदर भागात टँकर माफीया देखील फोफावले आहे, ही देखील वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळात ५ एमएलडी पाणी पुरवठा वाढवून देण्याचे आयुक्तांनी सांगितले. मात्र १० एमएलडी वाढीव पाणी पुरवठा दिला तरी देखील घोडबंदरचा पाणी प्रश्न सुटणार नाही. केवळ या वाढीव पाण्यामुळे केळकर यांच्या घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या भागापर्यंतचा पाणी प्रश्न सुटेल मात्र संपूर्ण घोडबंदरचा सुटणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील पाणी पुरवठा सुरळीत करायचा असेल तर त्यासाठी घोडबंदरला एकूण १०० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. सुर्या प्रकल्पातून मिराभार्इंदर यावर्षी पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच वसई विरारला देखील केला जाणार आहे, या दोन महापालिकांना पाणी दिल्यानंतर जे अतिरिक्त पाणी आहे, त्यातील १०० दशलक्ष लीटर पाणी हे ठाण्यासाठी मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यातील ५० वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धरणाचा प्रश्न देखील येत्या काळात मार्गी लागेल परंतु त्याला काहीसा वेळ लागणार असल्याने सुर्या प्रकल्प पाणी पुरवठा योजनेतून पाणी घेणे शक्य असल्याने त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.