मीरारोड : वरसावे नाक्या जवळील घोडबंदर महामार्गावर असलेला वाणिज्य वाहनांसाठीचा टोल नाका २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यामुळे होणारी वाहतूक कोंडी संपुष्टात येऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
ठाणे - घोडबंदर महामार्गाच्या रुंदीकरण, विकास व देखभालीच्या अनुषंगाने टोल वसुली सुरू झाली होती. परंतु सदर टोल मीरा भाईंदर व ठाणे हद्दीवर न ठेवता वरसावे नाक्याजवळ आणून टोलनाका बसवला होता. त्यामुळे ठाणेकरांना टोल नाही तर मीरा भाईंदरच्या नागरिकांना मात्र टोल भुर्दंड सहन करावा लागत होता. काही वर्षांपूर्वी सदर टोलनाक्या वर वाणिज्य वापराच्या मालवाहू वाहनांव्यतिरिक्त अन्य मोटार आदी वाहनांना टोलमधून सूट मिळाली. परंतु मालवाहू अवजड वाहनांच्या टोल वसुलीमुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असे. रात्रीच्या वेळी तर ठाण्यावरून येताऱ्या वाहनांची प्रचंड रांग लागत असे.
दरम्यान, घोडबंदर टोल वसुलीचा १५ वर्षांचा करार २४ डिसेंबर २०२० रोजी संपुष्टात आला होता. परंतु ठेकेदाराने लॉकडाऊनमुळे नुकसान झाल्याचे सांगत मुदतवाढ मागितली होती. त्या नुसार ठेकेदारास ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. सदर मुदतवाढीच्या विरोधात शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुदतवाढ रद्द करण्याची विनंती केली होती.
दुसरीकडे, मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत, सचिव हेमंत जुईकर, शहर संघटक दिनेश कनावजे आदींनी टोलची मुदतवाढ रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आदींसह प्रशासनाकडे केली होती. शासनाने सदर टोल नाका दिलेल्या मुदतवाढीच्या एक महिना आधीच म्हणजे २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.