शौकत शेख / लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : देशातच नव्हे तर जगाच्या नकाशावर नावाजलेले घोलवड, डहाणू, बोर्डी येथील चिकूचा गोडवा संकटात असून गेल्या तीन महिन्यापसून भावात सातत्याने घसरण होत असल्याने येथील हजारो बागायतदार अर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामूळे चिकूला हमी भाव मिळवून देण्याची मागणी येथील शेतकरी, बागायतदार करू लागला आहे. दरम्यान, शेतकरी, कामगार, तसेच बाहेरच्या बाजारपेठेत चिकू पाठविणारे दलालांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. कमी भावामुळे चिकू तोडणे, पॅकिंग करणे, वाहतूक करणे इत्यादी खर्च ही निघत नसल्याने बागायतदारांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे.सध्या बाजारात संत्रे, मोसंबी, द्राक्ष, आंबे, पेरू इत्यादी फळे मोठया प्रमाणात येत असल्याने हमखास वैभव मिळवून देणाऱ्या घोलवडच्या चिकूला मागणी कमी झाल्याने शिवाय टिकाऊ दर्जेदार व मोठ्या चिकूचे प्रमाण कमी झाल्याने डहाणूच्या मुख्य लिलाव केंद्रात मिक्स चिकू प्रति पाच रूपये तर मोठे फळ बारा रूपये किलो या दराने खरेदी विक्री होत आहे. विशेष म्हणजे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांकडे लहान चिकूचे प्रमाण जास्त असल्याने तसेच त्यांना भाव कमी मिळत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती दयनीय बनली आहे. दरम्यान घोलवड, डहाणू, तलासरी, विभागातील गोड चिकू फळ पिकांवर गेल्या वर्षी आस्मानी सूलतानी संकट कोसळले होते. अतिवृष्टीचा मोठा तडाखा येथील हजारो चिकू बागांना बसला होता. सतत वीस दिवस कोसळलेल्या पावसामुळे चिकूच्या बागेत पाणी साचून फळांवर बूरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने सर्व लहान मोठी फळे काळी पडून गळून पडली होती. तसेच भविष्यात बहर देणारी फुले व फळेही गडून पडल्याने आगामी वर्षभरात चिकूचे उत्पादन होणार नाही अशी भिती बागायत दारांकडून व्यक्त केली जात होती. परंतु, बदलत्या हवामानाच्या लहरीपणामुळे बहुसंख्य चिकूच्या झाडांना या वर्षी फुले आली आहेत. परतु, या वर्षी चिकूला मागणी कमी झाल्याने चिकूचे भाव दिवसेंदिवस घसरू लागल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. शंभर वर्षांपूर्वी आगमण अन् बनला आर्थिक कणा चिकू हे मुळचे दक्षिण अमेरीकेतील ब्राझिल येथील फळ आहे. सुमारे शंभर वर्षापूर्वी हे झाड ब्राझिलमधून ठाणे जिल्हयातील डहाणू तालुक्यातील घोलवड या गावी लावण्यात आले. या फळ झाडास घोलवड व परिसरातील जमीन आणि हवामान इतके पोषक ठरले की, ते येथील शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच बनले. त्यामुळे अल्पकाळातच त्याचा प्रसार, डहाणू, तलासरी, पालघर, वाणगांव, कासा व आजुबाजूच्या परिसरात झपाटयाने होऊन हजारो हेक्टरमध्ये या झाडांची लागवड झाली. त्यामुळे चिकू काढण्यासाठी लागणारे करंडे, विणकाम व बूरूड काम करणारा हमाल तसेच वाहतूकदार यांना रोजच्या रोज काम मिळाले.हंगामामध्ये दररोज २५० टन चिकू बाजारात पालघर जिल्हयातील हजारो चिकू बागायतदार तसेच आदिवासी मजूरांना हमखास रोजी रोटी उपलब्ध करून देणाऱ्या चिकूला दिल्ली, मुंबई, अजमेर, राजस्थान, नागपूर, गुजरात येथे मोठी मागणी आहे. डहाणू घोलवडचा परिसर हा चिकू पट्टा म्हणून सर्वत्र ओळखला जातो. पालघर जिल्हयात सुमारे पंचवीस हजार हेक्टर जमीनीवर चिकूच्या मोठ मोठया बागा असल्याने दररोज लाखोची खरेदी विक्री होत असते. चिकूच्या हंगामात दररोज डहाणू २५० टन चिकू बाजारात येत असते.
घोलवडचे चिकू पाच रूपये किलो
By admin | Published: May 31, 2017 5:32 AM