अंबरनाथ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर आता शिंदेंना चक्क सोन्याचा धनुष्यबाण भेट देण्यात आला आहे. अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा आणि युवती सेना राज्य कार्यकारिणी सदस्या प्रज्ञा बनसोडे यांनी हा सोन्याचा धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिला. हा सोन्याचा धनुष्यबाण पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काही काळ अचंबित झाले.
मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा धनुष्यबाण भेट दिला. हिंदुत्त्वाचा वारसा चालवणाऱ्या एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह मिळणे हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असून तो संस्मरणीय ठरण्यासाठी आपण त्यांना सोन्याचा धनुष्यबाण दिल्याचे बनसोडे यांनी सांगितले. तर दुसरीकडे स्वतः शिंदे यांनी आपल्या खिशावर हा धनुष्यबाण लावून ही भेट अनोखी असल्याचे मत व्यक्त केले.