ठाणे : ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कळवा खाडीवरील नवीन उड्डाणपुलावरील १०० मीटर तसेच ११०० टनाचा मुख्य सांगाडा अवघ्या चार तासांमध्ये बसविण्यात ठाणे महापालिकेच्या अभियंत्यांना यश आले. हा सांगाडा बसविल्यामुळे कळवा उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला असून, लवकरच दुसऱ्या टप्प्याचे कामही पुढील आठवड्यामध्ये करण्यात येणार आहे. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते.
ठाणे शहर आणि कळव्याला जोडून ठाण्यामधून नवी मुंबई, कोकण, पुणे तसेच ठाणे बेलापूरमार्गे जाण्यासाठी खाडीवर सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल अस्तित्वात आहे. तो जुना तसेच धोकादायक झाल्याने सप्टेंबर २०१० पासून वाहतुकीस बंद केला आहे. एकाच पुलावर वाहतुकीचा ताण येऊन मोठी कोंडी होत आहे. ती दूर करण्यासाठी हा नवीन पूल बांधण्यात येत आहे.