डोंबिवली - पत्रीपुलाच्या गर्डरचे भाग येण्यास सोमवारपासून सुरुवात झाली असून, 7 टप्प्यांमध्ये हैदराबाद येथून कल्याणला टेलर कंटेनरमधून ते भाग येणार आहेत. सुमारे 8० मेट्रिक टन वजनांचे लोखंडी गर्डरचे भाग शहरात येत असल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरु होती. पहिला भाग आल्यावर सोशल मीडियावर नागरिकांनी गर्डर आले पण ते वेळेत जोडा आणि दिलासा द्या, अशी मागणी केली. सगळे भाग आल्यावर मार्च अखेरीस ते लावण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती एमएसएआरडीसीच्या अधिका-यांनी ‘लोकमत’ला दिली.मध्य रेल्वेने नियोजनानुसार दोन ब्लॉक दिल्यानंतर गर्डर प्रत्यक्ष पत्रीपूलाच्या नियोजित जागी ठेवणे सोपे जाणार आहे. त्यामुळे आता एकीकडे गर्डर येत असतांनाच दुसरीकडे रेल्वे ब्लॉक कधी, किती तासांचे देते यासंदर्भातही एमएसआरडीसीच्या यंत्रणोला पाठपुरावा करावा लागणार आहे. टेलरमधून गर्डरचे भाग आल्यानंतर ते कल्याणमध्ये प्रकल्पाच्या मोकळया जागेत ठेवण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले. सगळे भाग आल्यानंतर त्यांचे एकत्रिकरण करून 75 आणि 35 अशा दोन टप्प्यात तांत्रिक काम करून ते जोडण्यात येतील. त्यानंतर आधी त्याची चाचणी होईल, आणि नंतरच प्रत्यक्ष पत्रीपूलाच्या नियोजित जागेत ते ठेवण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.सगळे भाग यायला सुमारे आठ ते दहा दिवस त्यानंतर पुढील तीन आठवडे जोडणीसाठी आणि त्यानंतर मार्च अखेरीस प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या एमएसआरडीसी, रेल्वे प्रशासन यांच्या नियोजनानुसार कोणताही अडथळा न येता काम झाल्यास पत्रिपुलाचे लोकार्पण ठरल्याप्रमाणे एप्रिलमध्ये होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नियोजनानुसार प्रकल्प बांधून लोकार्पण झाल्यास गेले दीड वर्ष पत्रीपुलावर तासन्तास वाहतूक कोंडीत अडकणा-या कल्याण डोंबिवलीच्या वाहनचालकांची सुटका होण्याची शक्यता आहे.