नितिन पंडीतभिवंडी - सध्याच्या जगात मुली अथवा महिला सुरक्षित नसल्याचे अनेक अत्याचाराच्या प्रकरणातून दररोज समोर येत असतात. त्यातच गरिबीमुळे घर सोडून मुंबईस कामाच्या शोधत आलेली मुलगी भिवंडीत तब्बल आठ महिने मुलगा बनून मिळेल ते काम करून गुजराण करीत असल्याचे पोलिसांनी संशय वरून ताब्यात घेतलेल्या मुलाची चौकशी करीत असताना तो मुलगा नसून मुलगी असल्याचे बिंग फुटले त्यामुळे पोलीस यंत्रणा ही चक्रावून गेली. छाया दशरथ माने ( वय २१ रा.हडपसर पुणे ) असे मुलगा बनून वावरणाऱ्या मुलीचे नाव आहे.
घरची हलाकीची आर्थिक परिस्थिती असल्याने पैसे कमविण्यासाठी छायाने पुण्यातील घर सोडले व मुंबईची वाट धरली .पण मुंबई मध्ये काम न मिळाल्याने तिने भिवंडी शहर गाठले .भिवंडीत मिळेल ते मोलमजुरीचे काम करून तिने आपली गुजराण सुरू केली . काम न मिळाल्यास कोणी दिलेल्या भाकर तुकड्यावर आपली भूक भागविली .भिवंडीत तब्बल आठ महिन्यांपासून छाया ही मुलगा बनून वावरत होती. परंतु लॉकडाऊन असल्याने तिला काम काही मिळालं नाही. तरी तिने जिद्द सोडली नाही जे काही काम मिळेल ते काम ती करायची तसेच राहण्याची सोय नसल्याने इमारतीच्या आडोशाला ती झोपायची. आशा परिस्थितीत वावरताना स्वतःचे रक्षण कसे करावे हा प्रश्न तिला सतावत असताना तिने शक्कल लढवली अन् मुलगा बनली. स्वतःचे नाव तिने समीर शेख असल्याचे सांगू लागली .त्यासाठी तिने स्वतःची वेशभूषा देखील बदलून मुलांसारखे केस लहान केले, त्यामुळे परिसरात कोणीही तिला मुलगी म्हणून ओळखू शकलं नाही.
दरम्यान लॉकडाऊन काळात शांतिनगर परिसरात पोलिस गस्त घालत असताना एका मुलावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली. परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी या मुलास पोलीस ठाण्यात आणून त्याकडे कसून चौकशी सुरू केली असता हे सत्य समोर आलं की तो मुलगा नसून ती मुलगी आहे. हे समजल्यावर पोलीसही चक्रावले. पोलिसांनी तिच्याकडून माहिती काढत तिचा घरचा पत्ता घेतला. ती पुणे, हडपसर परिसरात राहत असून तिचे खरे नाव छाया माने आहे हे स्पष्ट झाल्यावर शांतीनगर पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता छाया ही आठ महिन्या पासून बेपत्ता असल्याचे व त्या बाबत कुटुंबियांची तक्रार ही दाखल असल्याचे समजले तेव्हा पोलिसांनी दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांना भिवंडीत पाचारण केले व छाया हिस तिच्या कुटुंबियां कडे सुखरूप स्वाधीन केले आहे .