भिवंडी : फेसबुक व व्हॉट्सअॅपद्वारे मैत्री करून नोकरदार तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका भामट्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने दीड लाखाचा गंडा घातल्याची घटना शहरातील रावजीनगर येथे घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.नसीमा मेहराजउद्दीन अन्सारी ( २८) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. ही तरुणी तुर्कस्तानमध्ये नोकरी करत असताना तिची ओळख डॅनियल नावाच्यातरुणाशी फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर, नसीमा भारतात परतल्याने तुला लग्नाच्या भेटवस्तू पाठवायच्या आहेत, त्यासाठी सर्व्हिस चार्ज म्हणून एक लाख २२ हजार ५०० रुपये नेटबँकिंगद्वारे पाठवण्यास त्याने सांगितले.फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जवळीक वाढल्याने नसीमा हिने डॅनियल याच्यावर विश्वास ठेवला. त्याने स्वत:च्या विजया बँक व रामदीन थर याचे एसबीआय बँक खाते व सत्यम कुमार पणोची याच्या इको बँक खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार, नसीमा हिने नेटबँकिंगच्या माध्यमातून पैसे पाठवले. मात्र, बरेच दिवस उलटले तरी लग्नाच्या भेटवस्तू येत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिने शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन डॅनियल व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला दीड लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:58 AM