कसारा : शहापूर तालुक्यातील आघई (तानसा धरण) येथे असलेल्या जंगली महाराज आश्रमशाळेच्या मैदानावर शनिवारी एनसीसी कॅम्पमध्ये बंदुकीचे प्रशिक्षण सुरू असताना, सुटलेली गाेळी काही अंतरावर असलेल्या एका वस्तीत उडाली. तेथे अंगणात खेळणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीच्या मांडीत ही गोळी घुसल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
शहापूर पोलीस ठाण्यात जंगली महाराज आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल झाला आहे. आश्रमशाळा व्यवस्थापनाने काही दिवसांपासून एका महाविद्यालयाला शाळेचे मैदान भाड्याने दिले होते. प्रशिक्षणादरम्यान बंदुकीची गोळी सुटून ती ठाकूरपाडा वस्तीतील एका घराच्या अंगणात खेळत असलेल्या कांचन राया कोरडे हिच्या मांडीत घुसली. कांचनला ग्रामस्थांनी तत्काळ शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.