ठाणे: तीन वर्षीय मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करणाऱ्या रामकिरत गौड याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. घोडबंदर रोड परिसरात सहा वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.आरोपी रामकिरत गौड हा वाघबीळ जुनागाव येथील ट्रान्झिट कॅम्पजवळ सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. तीन वर्षीय पीडित मुलगी याच परिसरात वास्तव्यास होती. ३० सप्टेंबर, २०१३ रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात तिचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाली होती. तपास सुरू असताना २ आॅक्टोबर रोजी वाघबीळ जुनागाव येथील ट्रान्झिट कॅम्पजवळील जंगलात एका डबक्यामध्ये तिचा मृतदेह सापडला. हत्येपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे स्पष्ट झाल्याने तसा गुन्हा दाखल करून कासारवडवली पोलिसांनी आरोपी रामकिरत याला ३ आॅक्टोबर रोजी अटक केली होती. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सिन्हा यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी चालली. सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्ष ग्राह्यमानून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
चिमुरडीवर अत्याचार, मृतदेह डबक्यात टाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:16 PM