ठाणे: गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला यश आले आहे. मोबाईलवरील एक अॅप आणि फेसबुकच्या आधारे तिचा शोध घेण्यात या पथकाला यश आले. कोणीही अपहरण केले नव्हते, कौटूंबिक कलहातून घरातून निघून गेल्याची कबूली तिने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्रा येथील एका ४० वर्षीय महिलेच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार ५ नोव्हेंबर २०१६ रोजी दाखल झाली होती. याप्रकरणी ७ जानेवारी २०१७ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. या मुलीचा शोध लागत नसल्याने हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू महाले हे याप्रकरणी तपास करीत होते. याच मुलीची मोठी बहिण आणि तिच्या पतीने दहा दिवसांपूर्वी टिकटॉक या अॅपवर भोजपुरी गाण्याचा एकत्रित व्हीडीओ अपलोड केला होता. हाच व्हिडीओ पाहून या मुलीने मेव्हण्याचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्याच्याशी तिने मेसेंजर मार्फत चॅटींग केली. त्याचवेळी तिने घरातील इतरांचीही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब त्या मुलीच्या मेव्हण्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या निदर्शनास आणून दिली. तेंव्हा ती एका बनावट अभय शेट्टी या बनावट नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन त्याच्याशी चॅटींग करीत असल्याचे उघड झाले. त्याचवेळी पोलिसांनी शक्कल लढवून मेव्हण्याची सासू अर्थात तिची आई आजारी असल्याचा तिला मेसेज पाठविला. हा मेसेज पाहिल्यानंतर तिने व्हिडीओ कॉल केला. त्याचवेळी ती अभय शे टृटी नसून बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी असल्याचे तिनेच मान्य केले. तिने भेटायला येण्याचेही मान्य केले. ती २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता तिच्या चरईतील बहिणीला भेटण्यासाठी आल तेंव्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये ५ नोव्हेंबर २०१६ रोजी घरातून कौटूंबिक कलहामुळे निघून गेल्यानंतर गोरेगाव येथे वास्तव्याला होती. त्यानंतर कॅटरींगचे कामासाठी सुरत (गुजरात) येथे ती गेली. पुढे गुजरात येथून वसईमध्ये आठ ते नऊ महिने राहिली. सध्या नालासोपारा येथे वास्तव्याला होती. आता आपली कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
ठाण्यातून तीन वर्षांपासून बेपत्ता मुलीचा लागला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:42 PM
गेल्या तीन वर्षांपासून ठाण्याच्या मुंब्रा भागातून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय मुलीचा फेसबुकच्या आधारे शोध घेण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. घरातील कौटुंबिक कलहातून तिने घर सोडले होते, कोणीही तिचे अपहरण केले नसल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.
ठळक मुद्देअपहरण नसून स्वत: घरातून गेल्याचे केले मान्यठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरीफेसबुकच्या आधारे लागला तपास