कल्याण : पश्चिमेतील फॉरेस्ट कॉलनी परिसरातील नागेश्वर सोसायटीत राहणारी चेतना मोरे ही दहावीची विद्यार्थिनी गुरुवारी रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. रात्री उशिरा घरी परतताना लोकलमधून पडून तिचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.चेतनाने काही कामासाठी आईच्या पर्समधून पैसे घेतले. परवानगीशिवाय पैसे घेतल्याने आई रागावली. त्या रागातून ती कुणालाही न सांगता घराबाहेर पडली. चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी व शेजाऱ्यांनी तिचा शोध घेतला असता ती शहाड रेल्वे स्थानकात गेल्याचे समजले. स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही ती स्थानकात आल्याचे दिसले. तेथील पोलिसांच्या सूचनेनुसार त्यांनी ती घरातून निघून गेल्याची तक्रार दिली.चेतनाने शहाड स्थानकातून मुंबईला जाणारी लोकल पकडली. ती ठाणे स्थानकात दुपारी ३ वाजता उतरल्याचे तेथील सीसीटीव्हीत दिसले. त्यानंतर ठाणे ते दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती तेथे रात्री दिसली. तेथून तिने रात्रीच्या वेळी घरी परतण्यासाठी गाडी पकडल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. मात्र, त्यानंतर ती कोणत्या स्थानकात उतरली हे दिसत नाही. त्यामुळे आणखी चिंताग्रस्त असलेल्या पालकांनी ती दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त झालेल्या गर्दीत कुठे तरी गेली असावी, असा अंदाज बांधला. तेथेही तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही.घरी परतताना पालकांनी पुन्हा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडे चेतनाविषयी विचारणा केली असता एक मुलगी गाडीतून पडून मृत्यूमुखी झाल्याचे सांगितले. तिचा मृतदेह परळ स्थानकादरम्यान आढळला. तो कल्याणच्या रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह पालकांच्या ताब्यात दिला गेला.>कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरही घटना चेतनाच्या पालकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. चेतनाचे वडील पुरुषोत्तम मोरे यांचे सलूनचे दुकान आहे. चेतनाला लहान भाऊ आहे. चेतनाच्या आकस्मिक निधनामुळे तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
रागाच्या भरात घर सोडलेल्या मुलीचा लोकलमधून पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 1:02 AM