ठाणे : भावाशी झालेल्या भांडणातून अलाहाबाद येथून रेल्वेने मुंबईत बहिणीकडे जात असताना ठाणे स्थानकात भरकटलेल्या अल्पवयीन मुलीला शनिवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी तिच्या बहिणीच्या सुपूर्द केले. आरपीएफने दाखविलेल्या या प्रसंगावधानामुळे आपली बहीण सुखरूप परत मिळाल्यामुळे मुंबईतील साकीनाका येथील तिच्या बहिणीने पोलिसांसह रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक दोनवर शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मोनाली (नावात बदल) ही दहा वर्षांची मुलगी रडत असल्याचे ठाण्यातील आरपीएफ जवानांच्या लक्षात आले. प्रचंड भेदरलेली ही मुलगी सुरुवातीला कोणाशी काहीच बोलायला तयार नव्हती. त्यामुळे तिचा नेमकी पत्ताही शोधणे अवघड झाले होते. आरपीएफचे प्रमोद देने आणि रेल्वे चाईल्ड लाईनच्या सुस्मिता काटकर यांनी आरपीएफच्या कार्यालयात आणून तिला विश्वासात घेतले. तेव्हा ती मूळची अलाहाबाद येथे राहणारी असून भाऊ आणि भावजयीबरोबर तिचे भांडण झाले. त्यामुळे रागातून मुंबईतील बहिणीकडे रेल्वेने जात असल्याचे तिने या आरपीएफच्या पोलिसांना सांगितले. केवळ एका चिठ्ठीवर बहिणीचा मोबाइल क्रमांक तिच्याकडे होता. यापलीकडे मुंबईत कुठे जायचे, याची काहीच माहिती तिच्याकडे नव्हती. तिच्याकडील त्या मोबाइल क्रमांकाच्या आधाराने कुर्ला, साकीनाका येथील तिच्या बहिणीकडे पोलीस उपनिरीक्षक सोनाली मलैया यांनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुखरूप बहिणीच्या स्वाधीन केले. आपली बहीण सुखरूप मिळाल्यामुळे या बहिणीचे डोळे पाणावले होते. बहीण सुखरूप परत मिळाल्यामुळे तिच्या बहिणीने पोलिसांसह रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.
अलाहाबाद येथून ठाणे स्थानकात भरकटलेली मुलगी स्वगृही!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 7:02 AM