ठाणे : चार वर्षांपूर्वी उल्हासनगर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शाेध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. दहावीला दाेन वेळा नापास झाल्यामुळे तिने घर साेडल्यानंतर दाेन वर्षांनी स्वच्छेने लग्न केल्याचा दावाही केल्याचे चाैकशीत पाेलिसांना तिने सांगितले. चार वर्षांपूर्वी (२०१७) ही १६ वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची घटना उल्हासनगर येथे घडली होती. ती आता २० वर्षांची आहे. दहावी परीक्षेत दोन वेळा नापास झाल्याने पालक ओरडतील, या भीतीपोटी ती घरातून निघून गेली होती, अशी माहिती पोलीस उघडकीस आली आहे. ती बेपत्ता झाल्यानंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता; मात्र तिचे कोणीही अपहरण केले नव्हते. ती स्वतःच घर सोडून गेल्याचेही स्पष्ट झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.
उल्हासनगर येथील भोला यादव (नावात बदल) यांनी त्यांची १६ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार २१ जून २०१७ ला दाखल केली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता; मात्र चार वर्षे उलटूनही तिचा शोध लागला नव्हता. अखेर ठाण्याचे पाेलीस आयुक्त जयजित सिंग यांनी या घटनेचा तपास २३ ऑगस्ट २०२१ रोजी ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडे सोपविला. पाेलीस निरीक्षक अशाेक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस उप-निरीक्षक बी. डी. औटी यांचे पथक या घटनेचा तपास करीत हाेते.
ओळखीच्या तरुणाशी केले लग्न
ही मुलगी १५ सप्टेंबर २०२१ ला ठाण्यातील कोर्टनाका परिसरात येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कोर्टनाका परिसरात सापळा लावला. त्यावेळी एका लहान मुलासह एक महिला तिथे आली. घर सोडून गेल्यानंतर तिने १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ओळखीच्या एका तरुणाशी लग्न केल्याचेही तपासातून समोर आले आहे.
--------------------------