ठाणे : शारीरिक संबंधात अडसर ठरणा-या चार वर्षांच्या मुलाचा खून करणा-या मुंब्य्रातील प्रियकराला ठाणे न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या मुलाची जन्मदात्री आई न्यायालयात फितूर झाली; मात्र त्याची १२ वर्षाची बहिण तिच्या साक्षीवर कायम राहिल्याने आरोपीस सजा सुणावणे न्यायालयास सोपे गेले.मुंब्य्रातील कौसा येथील चांदनगरातील एका महिलेचे २५ वर्षीय अमीर इसमाईल सैय्यद उर्फ बिल्ला याच्याशी अनैतिक संबंध होते. महिलेचा पती तिला सोडून गेला होता. तिला एक मुलगा आणि दोन मुली होत्या. पती सोडून गेल्याने बिल्ला तिच्यासोबतच राहायचा. त्यांच्या शारीरिक संबंधांमध्ये बरेचदा मुलांमुळे अडथळा व्हायचा. बिल्लाच्या मनात त्यामुळे कमालीचा राग होता. ८ जून २0१५ रोजी सकाळी ४ वर्षीय मुलाला उलटी झाली. त्याची किळस येऊन बिल्लाने कमरेचा बेल्ट आणि टीव्हीच्या रिमोट कंट्रोलने त्याला जबर मारहाण केली. त्यामुळे जखमी झालेल्या या मुलावर ६ दिवस रुग्णालयामध्ये उपचार चालले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. न्या. पी.आर. कदम यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील संगिता फड यांनी १३ साक्षीदार तपासले. मुलाची आई न्यायालयात फितूर झाली. मात्र त्याची बहिण नगमा हिने न्यायालयासमोर संपूर्ण घटनाक्रम विशद केला.- बिल्लाने भावाला मारहाण केली, तेव्हा तिने वाचविण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात बिल्लाने नगमाचाही हात पिरगळल्याने तो मोडला होता. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने नगमाची साक्ष ग्राह्य धरण्याची विनंती वकिलांनी केली. ती ग्राह्य धरण्यात आली.
मुलीच्या साक्षीमुळे ठोठावली गेली आईच्या प्रियकरास जन्मठेप , बहिण ठाम राहिल्याने शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 3:44 AM