लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पित्यासमोरच एका ९ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग करणा-या ७९ वर्षीय शिवराम व्यंकटेश पाटकर या विकृताला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पाचवीतील ही मुलगी शाळा सुटल्यानंतर घोडबंदर रोड ऋतू इस्टेट येथून वडिलांसमवेत पायी घरी जात होती. तिचे दप्तर घेऊन वडील तिच्यापुढे काही अंतर जात होते. त्याचवेळी शिवरामने मागून अचानक येऊन पकडून तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्याने वडिलांनी मागे वळून पाहिले त्यावेळी तो तिथून पळ काढतांना त्यांना आढळला. त्यांनी त्याला पकडून जाब विचारला. त्यावेळी काही महिलाही तिथे जमा झाल्या. या गर्दीचा फायदा घेऊन तो तिथून पसार झाला. शनिवारी याप्रकरणी मुलीच्या पालकांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले, निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कैलास टोकले यांच्या पथकाने तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणच्या चार सीसीटीव्हींची पडताळणी केली. त्यावेळी एका सीसीटीव्हीमध्ये तो आढळला. त्यानंतर त्याची माहिती काढून सोमवारी त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवरामने यापूर्वीही तिची दोन वेळा छेड काढली होती. परंतु, भीतीपोटी तिने याबाबत वाच्यता केली नव्हती. शुक्रवारी मात्र तिने आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. आरोपी उच्चभ्रू वस्तीमध्ये वास्तव्याला असून त्याचा मुलगा बँकेत अधिकारी आहे. सुना, नातवंडे असा चांगला परिवार असतांनाही या वृद्धाने असा प्रकार केल्याने पोलिसांनीही खेद व्यक्त केला.
ठाण्यात पित्यासमोरच शाळकरी मुलीचा विनयभंग वृद्धास अटक
By जितेंद्र कालेकर | Published: October 16, 2018 8:18 PM
अवघ्या नऊ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या ७९ वर्षीय वृद्धाला कासारवडवली पोलिसांनी तीन दिवसांनी सीसीटीव्हीच्या फूटेजच्या आधारे अटक केली आहे. त्याने दोन वेळा असेच प्रकार केल्याचेही उघड झाले आहे.
ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांनी केली कारवाईसीसीटीव्हीच्या आधारे मिळाला तपासाचा धागातीन दिवस पोलीस कोठडी