विशाल हळदे -ठाणे: राज्य शासनाच्या महिला आणि बालकल्याण विगाभतर्फे राजमाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्या अंतर्गत शेठ एन के टी टी महाविद्यालयातील महिला विकास कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या तर्फे महाविद्यालतील विद्यार्थिनींसाठी 13 जुलै ते 15 जुलै प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. 190 पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी या शिबिराचा लाभ घेतला.
शासनातर्फे संरक्षण अधिकारी रेखा हिरे, प्रमुख व्यक्त्या डॉ. जयश्री कुलकर्णी, भारतीय स्त्री शक्तीच्या कार्यकर्त्या अंजली भालेराव आणि मुग्धा देशपांडे या कार्यक्रमास उपस्थित होत्या. महिला आणि बालकल्याण विभागातर्फे पहिल्या दिवशी विद्यार्थिनींना समुपदेशन करण्यात आले तर नंतरचे दोन दिवस त्यांना स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सोहम सरवणकर आणि त्याच्या समूहाने मुलींना प्रत्यशिकांसह माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य श्री. अनिल खडसे, महिला विकास कक्षाच्या समन्वयिका सौ.गीतांजली चिपळूणकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सौ. दिपाली मुलमुळे आणि श्री. विभव गळदगेकर यांनी प्रयत्न केले.