- राजू काळे
भार्इंदर : मीरा-भार्इंदर विधानसभा मतदार संघ १४५ चे विद्यमान भाजपा आ. नरेंद्र मेहता यांचा पत्ता पुढील वर्षी होणा-या आमदारकीच्या निवडणुकीत कट करण्यासाठी माजी महापौर गीता जैन यांनी कंबर कसली असून त्यांनी आपला जनसंपर्क वाढविण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केल्याची चर्चा राजकीय मंडळींत सुरु झाली आहे.जैन व मेहता यांच्यातील गटबाजीला २०१५ मधील सत्ता स्थापनेपासून ख-या अर्थाने सुरुवात झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची सत्ता उलथून सेना-भाजपा युतीची सत्ता स्थापन करण्यासाठी आ. मेहता यांनी २०१५ मध्ये लावलेली फिल्डींग यशस्वी झाली. या सत्तांतरानंतर मेहता यांनी महापौरपदावर आपली वहिनी व सध्याच्या महापौर डिंपल मेहता यांना विराजमान करण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु, मेहतांच्या या प्रयत्नांना गीता जैन यांचे बंधू संजय पुनमिया यांनी काटशह दिला. त्यात ते यशस्वी झाल्याने महापौरपदी डिंपल मेहता ऐवजी गीता जैन यांची वर्णी पक्षातील वरिष्ठ पातळीवरुन लावण्यात आली. यानंतर जैन यांनी स्थानिक बिल्डर दिलीप पोरवाल यांच्या बालदा भवन ही इमारत अनधिकृत असल्याची तक्रार स्वपक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचली केली. परंतु, मेहता यांनी जैन छेद देत पोरवाल यांचा मुलगा गौरव याला थेट भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विराजमान करण्यात यश मिळविले. त्यातच जैन गटावर मात करण्यासाठी त्यांच्या विरोधकांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश दिला. यामुळे मेहता व जैन गटातील वाद चव्हाट्यावर येऊ लागले. त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले असतानाच मेहता समर्थक व जैन समर्थकांमध्ये हाणामारीचे प्रकार घडू लागले. अखेर मेहता यांनी २०१७ मधील पालिका निवडणुकीत जैन गटातील बहुतांशी इच्छ्ुकांना उमेदवारी नाकारून आयारामांना संधी दिली. त्यावेळी जैन या सेनेत जाण्याच्या वावटळ्या उठविण्यात आल्या. मात्र जैन यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवून प्रभाग ६ मधुन त्या सर्वाधिक मतांनी निवडून आल्या. तर त्यांच्या गटातील उमेदवारी डावलेले नाराज सेनेत गेले. निवडणुकीतील भरघोस मतांमुळे आपल्या मागे जनमताच्या वाढल्याची भावना निर्माण झाल्याने त्यांना आमदारकीच्या निवडणुकीचे वेध लागले. दरम्यान पक्षाच्या विविध मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती केलेल्या मंडळींचा राबता जैन यांच्या दरबारी वाढू लागल्याने मेहता यांनी त्या मंडळींची अध्यक्षपदावरुन गच्छंती करुन समर्थकांची वर्णी लावली. यामुळे पायउतार झालेल्या बहुतांशी मंडळ अध्यक्षांनी जैन यांच्याकडे नाराजी व्यक्त करुन पक्षांतराची तयारी चालवली. परंतु, जैन यांनी त्यांना थोपवून धरले. जैन यांच्या पाठपुराव्यामुळे शहरात कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते नोव्हेंबर २०१७ मध्ये कृषी बाजार भरविण्यास सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटनावेळी मेहता यांच्यासह त्यांच्या गटातील एकाही लोकप्रतिनिधीने हजेरी लावली नाही. यामुळे दुखावलेल्या जैन यांना डिसेंबर २०१७ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात माजी महापौर म्हणून सन्मान न दिल्याने त्यांची नाराजी वाढली. ती त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा केली. यातूनच त्यांनी आपल्यामागे वाढलेल्या जनमताचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी अलिकडेच प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करुन संभाव्य आमदारकीच्या निवडणुकीतील दावेदारीचे संकेत दिले. यावेळी मेहता यांना पक्षातील वरीष्ठांच्या उपस्थितीमुळे आगंतुक व्हावे लागल्याची चर्चा त्यावेळी सुरु झाली होती. मेहता यांच्या वाढत्या एकाधिकारशाहीसह जैन यांच्या मानापमानाच्या नाट्यामुळे पुढील वर्षी होऊ घातलेल्या आमदारकीच्या निवडणुकीत जैन यांनी प्रबळ दावेदार बनण्याची तयारी आत्तापासूनच चालविल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
- येत्या आमदारकीच्या निवडणुकीत १४५ मतदार संघातून उमेदवारी मिळविण्यासाठी आपल्याकडुन नक्कीच दावा केला जाणार आहे. मात्र त्यावेळी पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्वाचा मानला जाईल.- माजी महापौर तथा विद्यमान भाजपा नगरसेविका गीता जैन