अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी भाजपकडे होता. या मतदारसंघातून भाजपचे आमदार विधानसभेवर गेले होते. मात्र, नंतर युतीधर्मात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे यावा, अशी आग्रही मागणी अंबरनाथमधील कार्यकर्ते करत आहेत. यासंदर्भात भाजप कोअर कमिटीच्या सदस्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत हा मतदारसंघ भाजपकडे देण्याची मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढल्यावरही भाजपचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे या मतदारसंघामध्ये भाजपचे मतदार वाढले असून चार वर्षांत भाजपची ताकदही वाढली आहे. या वाढलेल्या ताकदीचा विचार करून वरिष्ठांकडे हा मतदारसंघ मागण्यात येत असल्याचे कमिटी सदस्या पूर्णिमा कबरे यांनी स्पष्ट केले आहे.
अंबरनाथ मतदारसंघ १९७८ पासून भाजपचा (जनसंघ) बालेकिल्ला होता. त्याकाळी प्रा. राम कापसे, जगन्नाथ पाटील आदींनी अंबरनाथ मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. यानंतर, शिवसेना-भाजपतील अंतर्गत तडजोडीमुळे अंबरनाथ मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. तेव्हापासून अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आणि खासदार प्रतिनिधित्व करत आहेत. मागील निवडणुकीत शिवसेना व भाजप यांच्यात युती न झाल्याने भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे यांचा निसटता पराभव झाला. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविषयी कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे तारमळे यांनी सांगितले.