ठाणे : जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टर व अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने तपासणी करून गुन्हे दाखल करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय बोगस शोध व पुनर्विलोकन समितीचे सहअध्यक्ष मनूज जिंदल यांनी गुरुवारी दिले.जिल्हास्तरीय बोगस शोध व पुनर्विलोकन समितीची सभा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परग, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारत मासाळ यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, पोलिस व नगरपरिषदांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तपासणीचे निर्देशजिल्ह्यात बोगस डॉक्टरांची प्रॅक्टिस बंद व्हावी, यासाठी कठोर कारवाई करावी. तालुक्यांमधील वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या सर्वांची यादी तयार करून त्यांची तपासणी करावी. होमिओपॅथी अथवा नॅचरोपॅथीची पदवी असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करता येत नाही, अशा प्रॅक्टिस करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत. डॉक्टरांना दिलेल्या परवान्याप्रमाणेच ते प्रॅक्टिस करतात का, बोगस प्रॅक्टिस होते? याची कसून तपासणी करून तेथे छापा टाकावे, असे निर्देश जिंदल यांनी दिले.