- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे: इंग्रजीतच तक्रार अर्ज द्या असा आग्रह धरणाऱ्या महानगर टेलीफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) एका अमराठी अधिकाऱ्याने मराठीत दिलेला तक्रार अर्ज घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. तो तक्रार अर्ज केवळ मराठीत असल्याने त्या अधिकाऱ्याने त्या अर्जाची स्वतः दखल न घेता ती तक्रार नंतर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवली. आम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असल्याने आम्हाला मराठी येणे सक्तीचे नाही असे उत्तर तक्रारदाराला देण्यात आले.गेले 15 दिवस दोन्ही दूरध्वनी क्रमांक बंद असल्याने बुधवारी लेखी तक्रार अर्ज एन्व्हायरो व्हिजनच्या कळवा रुग्णालयातील घनकचरा व्यवस्थापन केंद्रातर्फे त्या अधिकाऱ्याला देण्यात आला. यावेळी त्यांना अधिकाऱ्याच्या या उत्तराला सामोरे जावे लागले. आपत्कालीन सेवा असलेले कळवा रुग्णालयातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राचा गेले 15 दिवस या केंद्रातील दोन्ही दूरध्वनी क्रमांक बंद आहे. त्यात कोरोनाच्या संकट काळात हे दोन्ही क्रमांक बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. या संदर्भात एमटीएनएलला या आधी वारंवार दूरध्वनीवरून तक्रार केल्या पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून घनकचरा व्यवस्थापन केंद्रातर्फे आज लेखी तक्रार अर्ज देण्यात आला. या केंद्रातील कर्मचारी ही तक्रार घेऊन गेले असता एमटीएनएलचे सहाय्यक व्यवस्थापक अखिल सत्यम यांनी ही तक्रार मराठीत असल्याने घेण्यास सुरुवातीला नकार दिला. यावेळी केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. विद्याधर वालावलकर यांनी सत्यम यांच्याशी संपर्क केला असता त्यांना दूरध्वनी दुरुस्त करणारा कर्मचारी कोरोनाची भीती असल्याने तो दुरुस्तीसाठी येऊ शकत नाही. तसेच, तुमचा अर्ज मला मराठीपेक्षा इंग्रजीत द्या, मला मराठी वाचता येत नाही. आम्हाला मराठी येणे सक्तीचे नाही, एमटीएनएलचा एम म्हणजे महानगर आहे, महाराष्ट्र नाही असे उत्तर दिले. आम्ही अर्ज इंग्रजीत का द्यायचा असा सवाल वालावलकर यांनी त्यांना केला आणि तो तक्रार अर्ज सत्यम यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याची सूचना वालावलकर यांनी आपल्या कर्मचाऱ्याला केली. तो अर्ज जरी स्वीकारण्यात आला असला तरी आपत्कालीन सेवेसाठी वापरण्यात येणारा बंद दूरध्वनी दुरुस्त करण्यासाठी अद्याप एमटीएनएलचा कर्मचारी तेथे पोहोचलेला नाही. यावेळी सत्यम याना संपर्क केला असता ते म्हणाले, माझ्याकडे तक्रार अर्ज हा इंग्रजीत आला तर मी स्वीकारतो. मराठीत आला तर मी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवतो. माझी नियुक्ती ही दिल्लीहून झाली आहे, महाराष्ट्रातून नाही त्यामुळे मला मराठी येणे सक्तीचे नाही. तसेच, आमचा कर्मचारी कळवा रुग्णालयातील घनकचरा व्यवस्थापन केंद्रात जाण्यास तयार नाही, ते पीपीइ किट मागत आज आणि हा किट आमही देऊ शकत नाही तो रुग्णालयाने द्यावा असे सत्यम यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाबद्दल समजल्यावर मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यानी सत्यम यांची कानउघडणी केली. पाचंगे म्हणाले, वालावलकर यांनी मला या प्रकरणाची माहिती दिली, कोरोना असल्यामुळे सत्यम यांची कानउघडणी फोनवरून केली आहे. पुन्हा असा प्रकार घडल्यास अशा अधिकाऱ्यांची 'कान'उघडणी प्रत्यक्षात जाऊन ते ही मनसे स्टाईलने केली जाईल. पाचंगे यांनी एमटीएनएलचे डिजीएम बोरुले यांच्याशी संपर्क करून असा प्रकार पुन्हा घडणार नाही याबाबत आश्वासन घेतले.