ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि आता दुसऱ्या लाटेतही आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता देण्यात यावा अशी मागणी श्रमिक जनता संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसह विविध प्रकारच्या फ्रंटवर असणाऱ्या, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी आपले जीव पणाला लावून सेवा दिली होती. आजही दुसऱ्या लाटेतही ते आपली सेवा निर्भीडपणे बजावत आहेत.
कोरोना संसर्ग वाढत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा अजूनही पूर्णपणे चालत आहे. शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार कोरोना काळात कार्यरत बसवाहक व चालक यांना गेल्या वर्षी तीन महिन्यांचा प्रत्येकाला ३०० रुपये कोविड भत्ता दिला होता. परंतु, दुसऱ्या लाटेत अजूनही तो अदा केलेला नाही. उलट कोरोनाकाळात सेवा देत असलेल्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात केला आहे. महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना कोरोना काळात कोणत्याही सुरक्षेच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. साधे सुरक्षा किटही उपलब्ध केलेले नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या वाढता प्रभाव पाहता या कर्मचाऱ्यांची काळजी घेणे आवश्यक असून त्यांना कोरोना काळातील सुरक्षा किट उपलब्ध करून द्यावे. तसेच कोविड भत्ता तत्काळ अदा करावा, अशी मागणी श्रमिक जनता संघाच्या अध्यक्षा मेधा पाटकर आणि सरचिटणीस जगदीश खैरालीया यांनी केली आहे.