नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : शहापूर तालुक्यात रस्ते सुविधा नसल्याने पटकीचा पाडा येथील गरोदर आदिवासी महिलेला कापडाच्या झोळी मधून घेऊन जात असताना तिची रस्त्यातच प्रस्तुती झाली,शहापुर येथील हे दुर्दैव चित्र देशाने बघितले आहे,देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षां नंतर ही घटना घडते आहे.मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे असताना त्यांच्या जिल्ह्यात आरोग्य व रस्ते सुविधांची असलेली दुरावस्था ही चिंताजनक आहे.एकीकडे जनतेचे हाल सुरू आहेत तर दुसरीकडे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा जनतेला घरबसल्या दाखले वितरित केले असते आणि तोच वाचलेला पैसा नागरिकांना सुविधा देण्याकरता खर्च केला असता तर ही वेळ आली नसती अशी टिका माजी महसूलमंत्री तथा विधिमंडळातील काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.सोमवारी थोरात हे ठाणे जिल्हा ग्रामीणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शना करता आले असता पत्रकारांशी बोलत होते.
नाना पाटोलेंच्या मताला सहमती-
काँग्रेसच्या राजवटीमध्ये मनमोहन सिंग यांनी बनवलेले कायदे राहुल गांधी सभागृहात फाडतात ही काँग्रेसची संस्कृती आहे अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली असून या टीकेला उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांनी राज्यमंत्रीच नव्हे तर केंद्रातील मंत्री यांच्या सुध्दा हातामध्ये काहीच नाही हे वास्तव आहे.मंत्र्यांच्या हातात काही नाही तर राज्यमंत्र्यांच्या हातात काय असणार, जे काही काम चालत ते प्रधानमंत्री कार्यालयातूनच चालते. या केंद्रीय मंत्रिमंडळाला शून्य किंमत आहे ही वस्तुस्थिती आहे असे स्पष्टीकरण देत थोरात यांनी नाना पटोले यांच्या प्रतिक्रेयेला दुजोरा दिला.
नथुरामांचे उदात्तीकरण करणे दुर्दैवी -
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह इंडिया कार्यकर्त्यांना पोलिसांनी मुंबईत अडविणे हे दुर्दैवी आहे.ज्या महात्मा गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली,सत्याग्रह असहकाराचा मार्ग दाखवला त्यांना अभिवादन करायला जायचं नाही,जी वृत्ती इंग्रजांची होती तीच वृत्ती भाजपा सरकारची आहे.भाजप कडून नथुरामाचे उद्दातीकरण करण्याचे काम सुरू आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे.या गोष्टीचे देशासह संपूर्ण जग निषेध करील अशी प्रतिक्रिया देखील यावेळी बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे .