टिटवाळा : मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गात कल्याण तालुक्यातील १२ गावे बाधित होत आहेत. यापैकी आठ गावांतील शेतकºयांना सरकारकडून जमिनीच्या मोबदल्याचे वाटप केले जाणार आहे. मात्र, हा मोबदला अतिशय कमी आहे. त्यामुळे योग्य मोबदला द्या, अन्यथा जमीन देणार नाही, असा पवित्रा सांगोडे आणि कोंढेरी येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कल्याण नितीन महाजन यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनात घेतला आहे.
मुंबई-वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनाचा अंतिम निवाडा ३१ मार्च २०१८ ला जाहीर करण्यात आला होता. त्यात बाधित होणाºया शेतकºयांना सरकारकडून दिला जाणारा मोबदलाही जाहीर करण्यात आला. मोबदल्याची रक्कम २४ आणि २५ आॅक्टोबरला दिली जाणार आहे. त्याबाबतच्या नोटिसा कोंढेरी, पिंपळोली, मांजर्ली, गोवेली, आपटीतर्फेबार्हे, नांदप, सांगोडे, वाहोली या आठ गावांतील शेतकºयांना पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारने जाहीर केलेला प्रतिगुंठा एक लाख ५८ हजारांचा दर कमी आहे. प्रतिगुंठा १० लाख मिळत नाही, तोपर्यंत आमच्या जमिनी महामार्गासाठी देणार नाही. प्रसंगी आंदोलनही करू, न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा सांगोडा-कोंढरे येथील शेतकºयांनी महाजन यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. वडिलोपार्जित जमिनी या महामार्गात संपादित होत आहेत.
पिढ्यान्पिढ्याच्या आमच्या जमिनी या महामार्गात संपादित झाल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी भूमिहीन झाला आहे. त्याचा विचार करून शासनाने आम्हाला योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी कोंढेरी येथील शेतकरी वसंत केणे यांनी केली. सरकारच्या विविध प्रकल्पांमध्ये भातशेती बाधित झाली आहे. योग्य मोबदला मिळत नसल्याने आमच्यावर अन्याय होत आहे. तो न मिळाल्यास जमिनी देणार नाही. प्रसंगी आंदोलन करू, असे सांगोडे येथील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले.निवेदन वरिष्ठांना पाठवलेभूसंपादनाचा अंतिम निवाडा ३१ मार्च २०१८ ला जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार, आम्ही मोबदला देणार आहोत. शेतकऱ्यांनी दिलेले हरकतीचे निवेदन आम्ही वरिष्ठ अधिकारीवर्गाकडे पाठवले आहे, असे कल्याण येथील उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी सांगितले.