डोंबिवली : खंबाळपाडा येथे मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडलेल्या तीन कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारी एमआयडीसीच्या कार्यालयावर डोंबिवली शहर मनसेने धडक दिली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदनही दिले.मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनसेने कार्यकारी अभियंता ननावरे यांची भेट घेतली. हे तिघे ज्या मॅनहोलच्या सफाईसाठी उतरले, तेथे सुरक्षात्मक उपाययोजना केलेली नसल्याची बाब उघड झाली आहे. अभियांत्रिकी कार्यवाहीत नमूद असलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करण्यात एमआयडीसी प्रशासन असमर्थ ठरल्याचा आरोपही यावेळी मनसेने केला.मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची भरपाई द्यावी तसेच त्यांच्या कुटुंबीयांपैकी एकाला नोकरीत सामावून घ्यावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी शिष्टमंडळाने केल्या.या सर्व मागण्यांची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर सविस्तर अहवाल द्यावा. ही कार्यवाही दिवाळीपूर्वी न केल्यास ऐन दिवाळीत एमआयडीसीविरोधात मनसेस्टाइल आंदोलन केले जाईल, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे कार्यकारी अभियंता ननावरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.एमआयडीसीविरोधातही गुन्हा नोंदवण्याची केली मागणीसफाई कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही सुविधा पुरवण्यात न आल्याने या घटनेला एमआयडीसी प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे कंत्राटदाराबरोबरच एमआयडीसी प्रशासनावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमिक जनता संघाचे चिटणीस जगदीश खैरालिया यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.तसेच डेÑनेज, मॅनहोलमध्ये काम करताना सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यास कामगाराच्या कुटुंबीयांना तत्काळ १० लाख रुपये सरकारने द्यावे. त्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, असे निर्देश मार्च २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचे तंतोतंत पालन करावे, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख, नोकरी द्या; मनसेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:24 AM