ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिकेतील 27 गावातील सफाई कामगरांना विमा संरक्षण मिळावे अशी मागणी कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. आमदार पाटील यांनीो आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत कोरोना संदर्भात विविध विषयांवर चर्चा केली.
27 गावे महापालिकेत 2015 साली समाविष्ट करण्यात आली. 27 गावात ग्रामपंचायतीत काम करणारे 499 कर्मचारी हे महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले. मात्र त्यांना महापालिकेच्या धर्तीवर कोणतेही सेवा लाभ दिले जात नाही. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर हे 499 सफाई कामगार 27 गावात कोरोना योद्धाची भूमिका बजावत आहेत. त्यांना विमा संरक्षण देण्यात अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. आमदार पाटील यांनी आयुक्त सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्याचबरोबर महापालिका हद्दीतील 27 गावांपैकी 7 गावातील लोक महापालिकेस मालमत्ता कर भरतात. त्यांना महापालिकेने सर्व प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. त्यात आरोग्याची काळजी घेणारी सुविधा आद्य स्वरुपात द्यावी. मात्र या गावातील कोरोना संशयीत रुग्णांना ठाण्यातील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जाते.
या गावातील रुग्णांना महापालिकेच्या हद्दीतील रुग्णालयात दिले जावेत याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने पांढ:या रंगाच्या रेशनकार्ड धारकांना कोरोना उपचाराचे बिल आकारले जाईल असे स्पष्ट केले आहे. पिवळ्य़ा व केशरी रंगाच्या रेशनकार्डधारकांना महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचाराचा लाभ दिला जाईल. रेशनकार्डचा रंग पाहून उपचारात सूट न देता. राज्य सरकारने यापूर्वी केलेल्या घोषणोनुसार सरसकट सगळ्य़ाच कोरोना रुग्णांचा उपचार मोफत करावी याकडे लक्ष वेधले आहे. हा मुद्दाही पाटील यांनी आयुक्तांसोबत चर्चिला. त्यावेळी सरकार यासंदर्भात जो निर्णय घेईल. त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी आमदार पाटील यांना दिले आहे. आरोग्य सेवा देणा:या डॉक्टर, नर्स यांच्याकरीता पीपीई किट कमी पडत असल्यास त्याकरीता आमदार निधी देण्याची तयारी आमदार पाटील यांनी दर्शविली आहे.