कल्याण : ऐतिहासिक कल्याण शहरातील पुरातन वास्तंूचे जतन व्हावे, यासाठी कल्याण हेरिटेज सोसायटी अस्तित्वात आली. त्याचे श्रेयही सदाशिव गोरक्षकर यांना जाते, अशी माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीनिवास साठे यांनी दिली.कल्याण शहराला मोठा इतिहास आहे. केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत सिंह यांच्या कारकिर्दीत कल्याणमध्ये पाडकाम सुरू झाले. त्यावेळी एमएमआरडीए समितीवर सदाशिव गोरक्षकर होते. त्यावेळी त्यांनी साठे यांच्याशी संपर्क साधून गावातील लोकांनी एकत्रित येऊन हेरिटेज सोसायटी का स्थापन करीत नाही, अशी गळ घातली. त्यावेळी प्रथमच महापालिकेने कल्याण हेरिटेज सोसायटी स्थापन केली. या सोसायटीच्या कामासाठी राज्य सरकारने त्यावेळी साडेचार लाखांचा निधी दिला होता. त्यातून कल्याण हेरिटेज सोसायटीच्या माध्यमातून शहरातील ९२ वास्तू या हेरिटेज असल्याची यादी तयार केली. तसेच ही यादी महापालिका व एमएमआरडीएला दिली गेली. मात्र, या सोसायटीच्या कामात पुढे सातत्य राहिले नाही. सध्या ही सोसायटी अस्तित्वात नाही. मात्र, गोरक्षकर यांच्या प्रयत्नातून कल्याणच्या हेरिटेजचे डॉक्युमेंटेशन झाले, ही मोठी बाब आहे. केडीएमसीला हेरिटेजचा अहवाल दिला. मात्र त्याची अंमलबजावणी महापालिकेने केली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
‘कल्याण हेरिटेज’ हे सदाशिवरावांचे देणे- श्रीनिवास साठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:59 PM