ठाणे - चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी स्थायी समितीचा राजीनामा दिला आणि पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा समोर आला. मुल्ला यांच्यासह नाराज १० ते १२ नगरसेवक पुढील आठवड्यात पक्षप्रमुख शरद पवार यांची पुन्हा भेट घेऊन, या मुद्यावर गुणात्मक चर्चा करण्याची मागणी करणार आहेत. परंतु, त्याआधीच विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पवार यांना पत्र पाठवून षटकार मारला आहे. प्रदेशस्तरावरील पदे आम्हाला नकोत. शहराध्यक्षपद तसेच विरोधी पक्षनेतेपदही मुल्ला आणि जगदाळे यांना तहहयात देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे राष्टÑवादीतील अंतर्गत कलह आता टोकाला पोहोचला आहे.राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी स्थायी समितीचा राजीनामा दिला. अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर झाला नसला तरी, त्यांच्या समर्थनार्थ राष्टÑवादीतील काही नगरसेवक पुढे आले आहेत. यामध्ये लोकशाही आघाडीचे गटनेते हणमंत जगदाळे यांचाही समावेश आहे. तीन महिन्यांपूर्वी या नाराज मंडळींनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गाºहाणे मांडले होते. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. आता नव्याने सुरू झालेले राजीनामानाट्य पालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या नाराजांनी ठाण्याची राष्टÑवादी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असल्याचा आरोप केला आहे. पुढील आठवड्यात शरद पवार यांची पुन्हा भेट घेण्याची तयारीही त्यांनी चालवली आहे. या भेटीतून त्यांच्या हाती काही लागण्याची शक्यता कमी असल्याने, पक्षातून आम्हाला काहीच मिळणार नसेल तर राहायचे कशाला, असा सूर या मंडळीने आळवला आहे. त्यामुळे येत्या काळात ठाणे शहर राष्टÑवादीमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. पवार यांच्या बैठकीमध्ये गुणात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा नाराज गटाने व्यक्त केली आहे. तशी चर्चा झाली नाही, तर मात्र वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीतसुद्धा ही मंडळी असल्याची माहिती राष्टÑवादीच्या सूत्रांनी दिली.दरम्यान, पुढील आठवड्यात १० ते १२ नाराज नगरसेवक पवार यांची भेट घेणार असले, तरी त्याआधीच विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पवार यांना पत्र पाठवून खळबळ उडवून दिली आहे.मला आणि परांजपे यांना प्रदेशच्या कमिटीवर जी पदे देण्यात आली आहेत, त्यातून मुक्त करावे. आम्ही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निष्ठेने काम करू, असे पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे. एकूणच राष्टÑवादीमधील हा वाद आता आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत असून येत्या काळात या पक्षात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत यातून मिळत आहेत.
नाराजांना तहहयात पदे द्या; अंतर्गत कलह पोचला शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 2:53 AM