ठाणे : ठाणे शहरतील झोपडपट्टी भागाचा पुर्नविकास करण्यासाठी व तेथील नागरिकांना हक्काचे अधिकृत घर मिळावे यासाठी एसआरए योजना राबविण्यात येत आहे. परंतु यातील सुमारे १६ प्रकल्प हे क्लस्टरच्या कात्रीत सापडले आहेत. त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले असले तरी शासनाकडून अद्याप त्याबाबत हालचाली होतांना दिसत नाही. त्यामुळे या योजनांचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत क्लस्टरचे ४४ युआरपी नियोजित करण्यात आले आहेत. त्यातील ५ युआरपीचे नकाशे अंतिम करण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते किसनगर नगर भागातील पहिल्या क्लस्टरचे भुमीपुजन करण्यात आले. क्लस्टर योजना मार्गी लागत असतांना १९९ झोपडपट्यांपैकी ११२ झोपडपट्यांच्या ठिकाणी महापालिकेने क्लस्टर योजना राबविण्याचे निश्चित केले आहे. यातील अनेक झोपडपट्यांचा एसआरएच्या माध्यमातून सर्व्हे झालेला आहे, काहींचे कामेही सुरु झाली आहेत. काहींच्या ठिकाणी नागरीकांना भाडे देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहेत तर तब्बल १६ प्रकल्पांच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून हे सर्व प्रकल्प युआरपीमध्ये येत असल्याने या प्रकल्पांच्या पुढच्या प्रक्रियेलाच ब्रेक लागल्याची माहिती समोर आली होती. यासंदर्भात राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार संजय केळकर यांनी देखील अधिवेशनात देखील आवाज उठविला होता. त्यानंतर शासनाने यात आता लक्ष घातले असून यावर काय उपाय योजना करता येऊ शकते, याचा विचार सुरु केला आहे. परंतु अद्यापही यावर तोडगा निघालेला नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान सोमवारी क्लस्टर योजनेच्या भुमीपुजनाच्या वेळेस केळकर यांनी क्लस्टरच्या कात्रीत अडकेल्या त्या १६ प्रकल्पांचा मार्ग विकास एसआरएच्या माध्यमातून करण्याची मागणी केली. त्यानुसार त्या संदर्भात विचार सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. त्यामुळे आता येत्या काळात या प्रकल्पांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मिनी क्लस्टर राबवा
किसननगर भागात क्लस्टरचे भुमीपुजन झाले. परंतु सर्वच भागात १० हजार चौरस मीटरवर क्लस्टर राबविणे शक्य नाही. त्यामुळे मिनी क्लस्टरचा विचार देखील करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
हे आहेत रखडलेले प्रकल्प
पाचपाखाडी, चेंदणी कोपरी , माजिवडे, कोपरी (ठाणेकरवाडी ), पाचपाखाडी ( सर्व्हे नं ४४७ पैकी ४४८ ), मौजे ठाणे, भीमनगर (वर्तकनगर ), मौजे पाचपाखाडी (प्लॉट नं ३९२), मौजे ठाणे ( मार्क्स नगर, आंबेघोसाळे तलाव, मीनाताई ठाकरे चौक ), नौपाडा (बी केबिन ), मौजे ओवळा, चरई, मौजे पाचपाखाडी ( भूमापन क्रमांक १६३/३/ ब ), मौजे चेंदणी ( नगर भूमापन क्रमांक ९६० ते ९७९ )