- प्रज्ञा म्हात्रे, ठाणेविद्यार्थ्यांनो, तुम्ही ग्लोबल एक्सपर्ट आहात आणि तुमची गरज या सर्व जगाला आहे. तसेच, भारताच्या प्रगतीसाठी मराठी मुलांची गरज आहे. समाजातील समस्या नि:पक्षपाती सोडवण्यासाठी प्रशासकीय सेवेसारखे क्षेत्र नाही. समाजातील गैरगोष्टी प्रशासकीय अधिकाराने सुधारू शकतात. प्रत्येक मुलाने स्पर्धा परीक्षेत सहभाग घ्यावा. त्यात अपयश मिळेल, नापास होईल, ही शंका आणता कामा नये. स्पर्धा परीक्षांची भीती बाळगू नका. परंतु, कुठे थांबायचे, हेही लक्षात घ्या, असे मोलाचे मार्गदर्शन आठव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित केले. समन्वय प्रतिष्ठान व स्टडी सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतन येथे सुरू असलेल्या आठव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या वेळी दीक्षित, संमेलनाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे, अभिनेते मकरंद अनासपुरे, स्वागताध्यक्ष आ. निरंजन डावखरे, ग्लोबल एज्युकेशन रिसर्च ट्रस्टचे विश्वस्त डॉ. आनंद पाटील, तेलंगणा येथील रचकोंडा शहराचे पोलीस आयुक्त महेश भागवत, व्हॅटचे उपायुक्त अजय वैद्य, ठाणे आरटीओ जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात योगदान देणाऱ्या कोल्हापूर येथील स्टडी सर्कलचे राहुल पाटील, ग्रंथसखाचे श्यामसुंदर जोशी, अल्मेडा लायब्ररी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दीक्षित पुढे म्हणाले की, एकदा ध्येय पक्के केले असेल, तर त्याच्या तयारीला लागा. मागेपुढे पाहू नका. शिक्षक, मार्गदर्शक असले तरी स्वत: तयारी करा. वयाच्या एकविसाव्या वर्षी मी यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो. मुलांची इच्छा असताना पालकांच्या दबावामुळे मुले स्पर्धा परीक्षांना बसत नाहीत. या परीक्षेसाठी जेवढा लवकर निर्णय घ्याल, तेवढे चांगले. जास्तीतजास्त पदवी घेतल्यावर याकडे वळण्याचा निर्णय घ्या. तो निर्णय मात्र पक्का असावा. जो कोणता विषय हाताळाल, त्यासंबंधित आॅथेन्टिक पुस्तके वाचा. ज्ञान वाढवण्यासाठी जर्नल्स वाचा. जी माहिती त्यातून घ्याल, ती तुम्हाला तुमच्या शब्दांत मांडता आली पाहिजे. या परीक्षेला कितीही लाख विद्यार्थी बसू दे, पण तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा. कल्पवृक्ष असलेल्या क्षेत्रात तुम्ही येणार आहात, हे सांगताना त्यांनी स्पर्धा परीक्षेची वैशिष्ट्ये सांगितली. ५० पेक्षा अधिक देशांचे लक्ष भारतावर आहे. ते वाट पाहत आहेत की, भारतातील एक्सपर्ट कधी येतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील, असेही त्यांनी सांगितले. अनासपुरे म्हणाले की, प्रशासकीय अधिकारी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा समाजात चांगल्या गोष्टी घडतात. आशेची ज्योत पेटताना दिसते. अभ्यास, ज्ञान ही कोणाची मक्तेदारी नाही. ज्ञानपिपासू विद्यार्थी मात्र हवा आहे. दोन ज्ञानी व्यक्ती एकत्र आल्या की, सुसंवाद, एक ज्ञानी व दुसरी अज्ञानी व्यक्ती एकत्र आली की, विसंवाद होतो आणि दोन अडाणी व्यक्ती एकत्र आल्या की, मारामारी होते. मारामारीचा समाज आपल्याला निर्माण करायचा नाही, तर सुसंवादी समाज निर्माण होणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेत मराठीचा टक्का वाढला पाहिजे. गुणवत्तेच्या ठिकाणी पेपरफुटीचे प्रदूषण हे समाजाला घातक आहे. समंजस लोक एकत्र येणे गरजेचे असून ज्ञानाचे एकत्रीकरण होणे महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.एखाद्या शहरात प्रशासक म्हणून जेव्हा तुम्ही काम कराल, तेव्हा त्या शहराशी जिव्हाळा ठेवा, असा सल्ला विद्यार्थ्यांना देत देशाला, राज्याला कोणत्या दिशेने न्यायचे, ही जबाबदारी मंत्र्यांवर जेवढी असते तेवढी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची असते, असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. आजही आयएएस, आयपीएस परीक्षांत महाराष्ट्राचा झेंडा नंबर वन आलेला नाही, अशी खंत व्यक्त करीत त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे भागवत यांनी सांगितले. अलीकडे स्पर्धा परीक्षांबाबत जागृती वाढत आहे. आमच्या वेळी पदवी घेतल्यावर स्पर्धा परीक्षांची तयारी केली जात होती. परंतु, आता दहावी, बारावीतच मुले तयारीला लागतात. कोणत्या कारणाने प्रशासनात यायचे, ती भूमिका पक्की हवी. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना चांगली मूल्ये आत्मसात करा. पूर्वपरीक्षेसाठी मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत असून परीक्षेचा पॅटर्न कसा बदलतो, हे पाहत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा, असा सल्ला त्यांनी दिला. लिखाणाचा सराव सोडू नका. कॉन्व्हेंटच्या मुलांपेक्षा मराठी माध्यमाच्या मुलांचा स्पर्धा परीक्षांत टक्का वाढतोय. दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे सरकारचे धोरण खटकत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. परीक्षा पद्धत ही विचार करणारी असावी. स्पर्धा परीक्षांत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या १०० मुलांमध्ये मराठी मुले कशी वाढवायची, हे आमच्यासमोर आव्हान आहे. लेखनाबरोबर वाचनाची सवय ठेवावी. प्रशासनात बराचसा अंधार आहे, तो तुम्हाला दूर करायचा आहे. आजही प्रशासन लोकांच्या दारात पोहोचत नाही. समाजात जगत असताना समाजाची सेवा करायची असेल, तर प्रशासकीय सेवा हे उत्तम करिअर आहे. मात्र, त्यासाठी मेहनत, चांगले गुरू, चांगले ग्रंथालय शोधा, असा कानमंत्रही त्यांनी दिला. आपल्याला प्रशासकीय अधिकारी का व्हायचे, हा प्रश्न एकदा मनाला विचारा आणि कधी, कुठे थांबले पाहिजे, याचाही विचार करा, असा सल्ला ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.कोकणातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांकडे ओढा कमी आहे. यात करिअर कसे घडू शकते, हा प्रयत्न या संमेलनाच्या माध्यमातून होणार आहे. अलीकडे स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत असताना गरज निर्माण होत आहे, ती स्पर्धा परीक्षेचे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण होण्याची आणि या संमेलनातून त्यादृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे, असे डावखरे यांनी सांगितले.ग्रंथदिंडीने दिला स्वच्छतेचा संदेश, पालखीत परीक्षेची पुस्तके१ठाण्यात सुरू असलेल्या आठव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाची सुरुवात शनिवारी सकाळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने झाली. या ग्रंथदिंडीतून शिक्षण आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. हारफुलांनी सजवलेल्या पालखीत ज्ञानोबा माऊलींची प्रतिमा, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी ग्रंथ, भारतीय संविधान, स्पर्धा परीक्षा नोकरीसंदर्भातील १९९० चा अंक, स्पर्धा परीक्षांची पुस्तके ठेवण्यात आली होती. गुरुदत्त भजनी महिला मंडळाने आरती करून दिंडीस सुरुवात झाली. २माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. निरंजन डावखरे, ग्लोबल एज्युकेशन रिसर्च ट्रस्टचे विश्वस्त डॉ. आनंद पाटील हे पालखीचे भोई झाले होते. न्यू इंग्लिश शाळा, बाल विद्यामंदिर, महाराष्ट्र विद्यालय या शाळांचे विद्यार्थी तसेच ब्रह्मकुमारी संस्था यात सहभागी झाले होते. ३‘स्वच्छता का रखिए ध्यान, स्वच्छता से देश बनेगा महान’, ‘मेरा शहर साफ हो, इसमे हम सबका साथ हो’, ‘स्वच्छ भारत, उज्ज्वल भारत’, ‘स्वच्छ भारत, समर्थ भारत’ अशा अनेक घोषणांचे फलक या दिंडीत दिसून आले. एकीकडे अग्निशमन दलाचा ब्रास बॅण्ड आणि दुसरीकडे ढोलताशांच्या गजराने परिसर निनादून गेला होता. यात रथदेखील होते. कौपिनेश्वर मंदिरातून पालखी बाहेर आल्यावर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने अचानक पालखीच्या दिशेने धाव घेतली. ही पालखी कसली, याची कोणतीही माहिती त्या व्यक्तीला नव्हती. परंतु, पालखी दिसताच त्याजवळ येऊन ज्ञानोबा माऊलींच्या प्रतिमेजवळ पुष्पार्पण केले. जांभळीनाका- सेंट जॉन दी बाप्टिस स्कूलसमोरील मार्ग-दगडी शाळा-गजानन महाराज चौक, राममारुती रोड, तलावपाळी या मार्गाने निघालेली दिंडी गडकरी रंगायतन येथे विसर्जित झाली.
स्पर्धा परीक्षा बेधडक द्या
By admin | Published: March 05, 2017 3:23 AM