- सदानंद नाईक
उल्हासनगर : राज्यातील सिंधी समाजाचे एकमेव आमदार कुमार आयलानी यांना मंत्रीपद द्या, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. या मागणीला शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यासह व्यापारी व विविध सिंधी सामाजिक संस्थेने पाठिंबा दिल्याचे पुरस्वानी यांचे म्हणणे आहे.
उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातून सलग चार वेळा आमदार पदी निवडून येणारे पप्पु कलानी यांचा पराभव करून कुमार आयलानी पहिली वेळ आमदार पदी निवडून आले. तर यावेळी आमदार त्यांनी ज्योती कलानी यांचा पराभव करून आमदार पदी निवडून आले. उल्हासनगर हे सिंधी समाजाचे नेतृत्व करणारे शहर म्हणून देशात ओळखले जाते.
तसेच आयलानी हे सिंधी समाजाचे एकमेव आमदार असल्याने त्यांना मंत्रीपद देण्याची मागणी राज्यातील सत्ता बदल होताच होत आहे. पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनीं थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून मंत्रिपदाची केली. तसेच पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडेही मंत्रिपदाची मागणी केल्याचे भाजप शहाराध्यक्ष पुरस्वानी म्हणाले.
ठाणे जिल्ह्यातून मंत्री पदासाठी गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, संजय केळकर, प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर यांच्या नावाची चर्चा असतांना, सिंधी समाजाचे एकमेव आमदार म्हणून कुमार आयलानी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. आयलानी यांना राज्यातीलच नव्हेतर देशातील सिंधी समाजाच्या विविध संघटनेचा पाठिंबा मिळत आहे. तसेच आयलानी हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
गेल्या महापालिका निवडणुकीत भाजप व ओमी कलानी टीम यांची युती झाल्यावर भाजप महापौर पदाचा मान आमदार कुमार आयलानी यांच्या धर्मपत्नी मीना आयलानी यांना मिळाला होता. तसेच शहरातून कलानी राज संपुष्टात आणण्यासाठी आयलानी यांचा मोठा हात असल्याचे बोलले जाते. आजही त्यांची भूमिका पप्पु कलानी विरोधी असून पप्पु कलानी यांच्या पेरॉल बाबतही आयलानी यांनी प्रश्नचिन्हे उभे केले. मंत्री पदाच्या भाऊगर्दीत कुमार आयलानी यांचा नंबर लागला नाहीतर, राज्यातीलच नव्हेतर देशातील सिंधी समाजात नाराजी पसरेल. असे आयलानी यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.