अनिकेत घमंडी डोंबिवली : रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरात व्यवसायास न्यायालयाने निर्बंध घातल्याने फेरीवाल्यांनी पूर्वेतील टाटा पॉवर लाइनखालील जागा मागितली आहे. मात्र, ही जागा फेरीवाल्यांना देण्यास स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला आहे. आधीच तेथे होणाºया वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे आम्ही हैराण आहोत. त्यात आता फेरीवाल्यांची भर पडल्यास शांततेचा भंग, कचरा आदी समस्यांना सामोरे जावे लागेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, रहिवाशांचा विरोध असल्यास आम्हाला केडीएमसीनेच निश्चित केलेल्या ३७ हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित करा, अन्यथा आहे तेथेच बसून व्यवसाय करू, अशी भूमिका फेरीवाला संघटनांनी घेतली आहे.न्यायालयाच्या निर्बंधामुळे केडीएमसी प्रशासन फेरीवाल्यांना रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय करू देत नाही. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. टाटा पॉवर लाइनखाली जागेत त्यांनी स्थलांतरित होण्याचा पर्याय निवडला आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये रविवारी बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत ठिकठिकाणच्या रहिवाशांनी सभागृह नेते, नगरसेवक राजेश मोरे यांची भेट घेत येथे फेरीवाले नकोत, अशी सूचना केली. फेरीवाल्यांना नगरसेवकांनी विरोध न केल्यास निषेधाचा पुढचा टप्पा ठरवण्यासाठी आम्ही लवकरच एकत्र येऊ, असे सागर घोणे याने सांगितले.टाटा पॉवर लाइनखाली बेकायदा वाहने पार्क उभी केली जातात. त्यामुळे आम्हाला सोसायटीत जाण्याचा मार्गही बंद होतो. रस्ताच्या रस्ता व्यापला जातो. आता त्यात वाहने पार्किंगच्या पुढे फेरीवाले येणार, हे योग्य होणार नाही. वाहने रात्री, मध्यरात्रीपर्यंत नेली जात नाहीत. अनेकदा युवक बायकर्स असल्याचे दाखवण्यासाठी सुसाट, कर्कश हॉर्न वाजवत गाड्या चालवतात. त्याचा त्रास होतो. त्यात आता फेरीवाले येणार आरडा ओरडा करणार. त्यामुळे फेरीवाले नकोच. बेकायदा पार्किंग हटवताना महापालिका प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना नाकी नऊ आले आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आता आणखी त्रास नको, असा पवित्रा रहिवाशांनी घेतल्याचे सागर घोणे याने सांगितले. सोमवारचा बाजार टाटा लाइनखाली भरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.दरम्यान, टाटा पावॅर लाइन परिसर हा फेरीवाला क्षेत्रात येतो. असे असतानाही रहिवसी आम्हाला ही जागा देण्यास विरोध का करत आहेत, हेच समजत नाही. महापालिकेच्या ‘ह’ प्रभागात ६, ‘ग’ प्रभागात ९, ‘फ’ प्रभागात २२ अशा एकूण ३७ ठिकाणी असलेले अधिकृत फेरीवाला क्षेत्रे आहेत. तसे फलकही महापालिकेने तेथे लावले आहेत. महापालिका तेथील जागा रिकामी करून आम्हाला व्यवसाय करण्यास संधी द्यावी, अशी मागणी फेरीवाला संघटनांनी केली आहे.>अन्यथा अवमान याचिका टाकणारफेरीवाल्यांना नागरिकांचा तर विरोध आहेच. पण टाटा लाइनखाली मोकळी जागा जरी दिसत असली तरी उच्च दाबाच्या वायरखाली बसण्यास केडीएमसीही कधीही परवानगी देणारच नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त पी. वेलरासू हा प्रस्ताव कधीही मान्य करणार नाहीत. रहिवाशांनी काही काळजी करू नये.- राजेश मोरे,सभागृह नेते, केडीएमसीकेडीएमसी प्रशासनाने हरकती, सुनावण्या घेत डोंबिवलीतील ‘फ,’ ‘ग,’ ‘ह’ प्रभागात ३७ फेरीवाला क्षेत्र निश्चित केले आहेत. तेथील अतिक्रमण काढावे, आम्हाला जागा द्यावी. तोपर्यंत आमचे कितीही नुकसान झाले तरीही आम्ही स्थानक परिसरात बसणारच.- प्रशांत सरखोत, सल्लागार, कष्टकरी हॉकर्स युनियन
अतिक्रमण हटवून आम्हाला ३७ झोन द्या, टाटापॉवर लाइनखालील जागा देण्यास रहिवाशांचा कडाडून विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 3:04 AM