लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : बीएसयूपी योजनेतील घरे मिळण्यास विलंब होत असल्याच्या निषधार्थ डोंबिवली येथील इंदिरानगरमधील पात्र लाभार्थ्यांनी गुरुवारी कुटुंबासह केडीएमसी मुख्यालयावर धडक देत घरे देण्याची मागणी केली. शिवसेनेचे माजी नगरसेवक व डोंबिवली विधानसभा संघटक तात्या माने यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सोमवारी कल्याण-डोंबिवली बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाईल, अशी घोषणा केली. डोंबिवली पूर्वेतील इंदिरानगरमध्ये २००८ मध्ये बीएसयूपी योजनेचे काम सुरू झाले. यातील १४४ लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी घरांचे वाटप करण्यात आले. परंतु, अन्य ४८ लाभार्थ्यांची पात्र यादी मार्चच्या महासभेत जाहीर होऊनही त्यांना अद्याप घरे मिळालेली नव्हती. प्रशासनाने ३० दिवसांची दिलेली मुदत ३ जूनला संपली. गेली सातआठ वर्षे हे लाभार्थी अन्यत्र दरमहा पाच ते सहा हजार रुपये भाडे भरून राहत आहेत. उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही एप्रिल २०१६ पासून त्यांना घरभाडे मिळालेले नाही, याकडे माने यांनी लक्ष वेधले. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी बीएसयूपीची घरे तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्या, अशी मागणी महापौर देवळेकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यांना घरे द्यावीत, या मताचे आम्हीही आहोत. परंतु, अनेक महिन्यांपासून घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना घरे मिळणार कधी, हा माझा सवाल असल्याचे माने म्हणाले. दरम्यान, महापौर देवळेकर, सभापती रमेश म्हात्रे व कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सोमवारी चाव्या देण्याचा निर्णय झाल्याची माहिती माने यांनी दिली.इतर लाभार्थ्यांनाही मिळणार चाव्याडोंबिवलीत इंदिरानगर बीएसयूपी योजनेतील ४८ लाभार्थ्यांना सोमवारी चाव्यांचे वाटप केले जाईल. साठेनगरमधील लाभार्थ्यांना उंबर्डे येथे घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तेथील बीएसयूपी योजनेतील २४ लाभार्थ्यांनाही त्याच वेळी घरांचा ताबा दिला जाणार आहे. कल्याण इंदिरानगरमधील ४० लाभार्थ्यांनाही चाव्यांचे वाटप केले जाईल, अशी माहिती बीएसयूपी प्रकल्प अभियंता सुनील जोशी यांनी दिली.सध्या डागडुजीसाठी अत्रे रंगमंदिर बंद ठेवले असल्याने चाव्यावाटपाचा कार्यक्रम मुख्यालयातील महापालिका भवनमधील स्थायी समिती सभागृहात सोमवारी सकाळी १० वाजता होईल, असेही जोशी यांनी सांगितले.
आम्हाला घरे द्या!
By admin | Published: June 16, 2017 2:09 AM