ठाणे : महासभांमध्ये गोंधळात चुकीचे प्रस्तावही मंजूर करून घेण्याची परंपरा शुक्रवारी सत्ताधारी शिवसेनेला महागात पडली. महासभेत हर्बल हॅण्डवॉशच्या प्रस्तावावर बोलण्यास उठलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका मीनल संख्ये यांना त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी बोलण्यास मज्जाव केल्याने त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. तुम्हाला तुमच्या सुपाºया वाजवायच्या, तर वाजवा. मात्र, आम्हाला एखाद्या विषयावर बोलण्याची संधी तरी द्या. यापुढे तुमची मनमानी खपवून घेतली जाणार नाही... वाटले तर पालकमंत्र्यांकडे माझी तक्रार करा... अशा शब्दांत त्यांनी स्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले. स्वत:च्याच नगरसेविकेकडून खडेबोल ऐकायला मिळाल्यानंतरही सत्ताधाऱ्यांनी सर्वच विषय गोंधळात मंजूर करून घेतले.दोन दिवसांपासून ठाणे महानगरपालिकेची महासभा सुरू असून, शुक्रवारी पटलावर अनेक महत्त्वाचे आणि काही चुकीचे प्रस्तावसुद्धा मंजुरीसाठी आले होते. यामध्ये बुलेट ट्रेनसाठी म्हातार्डी येथे आरक्षणांमध्ये बदल करणे, आपला दवाखाना, कोपरी आणि लोकमान्यनगर भागात क्लस्टरसाठीचे सर्वेक्षण, ई-गव्हर्नन्स आदींसह इतरही महत्त्वाचे प्रस्ताव पटलावर होते. राष्टÑवादीने आधीच पत्रकार परिषद घेऊन या प्रस्तावांना विरोध दर्शवला होता. त्यामुळे हे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आधीपासूनच शिवसेनेच्या काही मंडळींनी फिल्डिंग लावली होती. त्यानुसार, दुपारी जेवणाची सुटी झाल्यानंतर सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास महासभा पुन्हा सुरू झाली. यावेळी महत्त्वाचे प्रस्ताव पटलावर येणार होते. या प्रस्तावावरून गोंधळ उडणार, हे सत्ताधाºयांना माहीत होते. त्यामुळे विरोधकांनी गोंधळ केला, तरी ते प्रस्ताव मंजूर करायचे, अशी रणनीती सत्ताधाºयांनी आखली होती. त्यात ते यशस्वीसुद्धा झाले. काही विषयांवर बोलण्यास विरोधकांना डावलण्यात आल्याने त्यांनी सभात्याग केला. तरीही, विरोधी गटातील काही नगरसेवक सभागृहात होते. त्यामुळे गोंधळात विषय मंजूर करून घेण्याची घाई प्रशासनासह शिवसेनेला लागली होती. त्यात हर्बल हॅण्डवॉशच्या विषयावर शिवसेनेच्या नगरसेविका मीनल संख्ये यांना चर्चा करायची होती. परंतु, त्यांनासुद्धा शिवसेनेच्या ज्येष्ठ मंडळींनी चर्चा करू दिली नाही. त्यामुळे त्या संतापल्या.|त्या म्हणाल्या, तुम्हाला तुमचे सुपारीचे विषय वाजवायचे असतील तर वाजवा, मात्र आम्हाला बोलण्याची संधी तरी द्या. यापुढे तुमची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. वाटले तर माझी तक्रार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करा. पण, आता मी बोलायचे थांबणार नाही, असे खडेबोल त्यांनी शिवसेनेच्याच ज्येष्ठ नेत्यांना लगावले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे सभागृह काही वेळ स्तब्ध झाले. अशा परिस्थितीतही सत्ताधाºयांनी मनमानी करत सर्वच प्रस्ताव मंजूर करून घेण्यात धन्यता मानली.वादग्रस्त प्रस्तावांना मंजुरीठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना हॅण्डवॉश पुरवण्याचा वादग्रस्त प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने बहुमताच्या जोरावर आणि सभागृहात परंपरागत गोंधळ घालून मंजूर केला. त्याशिवाय सुमारे ६० कोटी रु पये खर्चाचा आणि फेब्रुवारी महिन्यात कमालीचे आक्षेप नोंदवत तहकूब केलेले जी-गव्हर्नन्स आणि मोबाइल अॅपचे प्रस्तावही कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करण्यात आले आहेत. हॅण्डवॉशच्या प्रस्तावाला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने, तर बुलेट ट्रेनसाठी आरक्षणबदलास राष्ट्रवादीने कडाडून विरोध केला. मात्र, बहुमताच्या जोरावर ते प्रस्ताव शिवसेनेने मंजूर करून घेतले. तत्पूर्वी, आपला दवाखान्याचा १४४ कोटी रु पये खर्चाचा प्रस्तावही विरोध डावलून मंजूर करण्यात आला.भाजपच्या सलगीमुळे बुलेट ट्रेन सुसाटमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिवसेनेने सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला होता. मात्र, भाजपशी मनोमिलन झाल्यानंतर शिवसेनेने आपली भूमिका बदलल्याच्या चर्चेवर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले.बुलेट ट्रेनसाठी ठाणे शहरातील काही आरक्षणांमध्ये बदल करणे क्रमप्राप्त आहे. त्याबाबतचा प्रस्ताव यापूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये प्रशासनाने मांडला होता. मात्र, बुलेट ट्रेनलाच विरोध असल्याने हा प्रस्ताव शिवसेनेने पटलावरच घेतला नव्हता.या महिन्याच्या सभेत शिवसेनेने हा विषय केवळ विषयपत्रिकेवरच घेतला नाही, तर सभागृहात गोंधळ घालून त्याला मंजुरीसुद्धा दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बहुमतापुढे त्यांचा विरोध बेदखल करून बुलेट ट्रेनला शिवसेनेने हिरवा कंदील दाखवला.
तुम्ही सुपाऱ्या वाजवा, आम्हाला बोलू तर द्या; नगरसेविकेचा शिवसेनेला घरचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:09 AM