ठाणे : दिवंगत रत्नाकर मतकरी यांनी कोणत्याही विद्यापीठाची मानस शास्त्रातील पदवी संपादन केलेली नव्हती. मात्र माणसातील गंड, विकृती, संवेदना, आकांक्षा, नाते संबंधातील तणाव, अघटितता, आकस्मितता या साऱ्या मनोविकारांचे सखोल भान मतकरींना होते, हे त्यांच्या चतुरस्त्र लिखाणातून जाणवते. अध्यात्मिक मानस शास्त्रापासून ते राजकीय आणि विकासात्मक मानस शास्त्रापर्यन्तच्या विस्तृत कॅनव्हास वर त्यांनी लेखन केले. एका अर्थाने मतकरी मानसशास्त्रात डॉक्टर आणि डॉक्टरेट या पदव्या संपन्न केलेले होते अशा शब्दात ठाण्यातील ज्येष्ठ माणसपोचार तज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या. या मानसशास्त्रीय आकलना बरोबरच त्यांचे सामाजिक भान जागरूक होते. त्यामुळेच वंचितांचा रंगमंचसारखी अत्यंत अनोखी आणि क्रांतिकारक संकल्पना त्यांनी मांडली आणि ती लोकवस्तीतल्या मुली - मुलांच्या माध्य्मातून प्रत्यक्ष साकारण्यासाठी, त्यांनी खूप परिश्रमही घेतले. त्यांचे वंचितांच्या रंगमंचाचे स्वप्न आता कुठे बाळसे धरत होते. ते अधिक समृद्धपणे साकार करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात नाडकर्णी यांनी मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली. समता विचार प्रसारक संस्था आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने फेसबुक लाईव्ह च्या स्वरूपात आयोजित मतकरींच्या स्मरण यात्रेत ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी मतकरीं सोबत केलेल्या सिरीयल आणि अन्य कलाकृतींच्या आठवणी जागवत, मतकरी खूप स्पष्टवक्ते, परखड आणि तितकेच सुजाण मानवी संबंध जपणारे व्यक्तिमत्व होते, असे सांगितले. वंचितांचा रंगमंच हे मतकरींना पडलेले अत्यंत विशाल स्वप्न होते. ते यापुढील काळात अधिकाधिक विकसित करण्याची जबादारी आपण सर्व रंगकर्मींनी उचलली पाहिजे, असे ते म्हणाले. मतकरींचे कुटुंबिय प्रतिभा व गणेश मतकरी तसेच सुप्रिया विनोद उपस्थित असलेल्या या इ - आदरांजली सभेचे प्रास्ताविक, समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त आणि वंचितांच्या रंगमंचाचे सूत्रधार डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मतकरी कितीही मोठे सेलिब्रेटी साहित्यिक असले तरी ते मुळात एक संवेदनशील माणूस होते. त्यातूनच त्यांनी सामाजिक प्रश्नावर थेट भूमिका घेत अनेक जन आंदोलनांना बळ दिले. नर्मदा बचाव, एनराॅन विरोधी, गिरणी कामगार, निर्भय बनो अशा विविध आंदोलनात त्यांनी हिरीरीने भाग घेतला आणि सामान्य जनांना धीर मिळवून दिला. वंचितांचा रंगमंच ही संकल्पना साकारण्यासाठी त्यांनी ठाण्यातल्या लोकवस्त्या निवडल्या व आमच्या वंचित एकलव्यांना अभिव्यक्तीच्या माध्यमातून आत्मविश्वास प्रदान केला. त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं. एका परिने वंचितांचा रंगमंच आता पोरका झाला, असं ते शेवटी म्हणाले. अध्यक्षीय समारोप करतांना साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रमोद निगुडकर म्हणाले, सतत नव - निर्मितीचा ध्यास असलेला, कार्यकर्त्यांचा नैतिक आधार आम्ही गमावून बसलो आहोत. नाट्य जल्लोषच्या संयोजक व रंगकर्मी हर्षदा बोरकर यांनी या सभेचे सूत्र संचालन केले. ---------------------------------------------------------------------वंचितांचा सिनेमा हे पुढचे पाऊल टाकणार!
प्रसिद्ध नाट्य दिगदर्शक विजय केंकरे म्हणाले, आम्ही आता ज्येष्ठ या सदरात मोडायला लागलो आहोत. पण आमच्या सारख्या तथाकथीत ज्येष्ठांचीही कान उघाडणी करणारा आता कुणी राहिला नाही. मतकरींना तो हक्क होता. चित्र, कथा, भयकथा, पटकथा, नाट्य अशा साहित्याच्या विविध फॉर्म्स वर मतकरींची हुकूमत होती. त्यामुळे कोणत्या गोष्टीसाठी कोणता फॉर्म प्रभावी ठरेल याचा विचार करून त्यांनी विविध साहित्य निर्माण केले आहे. एकीकडे मंचावर राजकारणी असतील तर मी तिथे नसेन अशी भूमिका घेणारे मतकरी, अन्याय आणि अभावग्रस्तांच्या बाजूने अत्यंत हिरीरीने आणि पोटतिडिकीने उभे राहत. त्यांनी आपल्या उदार स्वभावाने अनेक माणसे घडवली. त्यांचे जीवन समृद्ध केले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्ष आणि साहित्यिक नीरजा म्हणाल्या की, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक उभारणीत मतकरींनी योगदान दिले. आशयघन अशा अनेक प्रकारच्या साहित्यकृती देणारा हा साहित्यिक तितक्याच आवेगाने सामान्य माणसाच्या न्यायासाठी उभा राहत असे. भूमिका घेत असे, असा माणूस पुन्हा होणे अवघड. स्वतःच्या प्रतिकूलतेशी झुंजत, स्वबळावर आपले वेगळेपण सिद्ध करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक - निर्माते विजु माने यांनी वंचितांच्या रंगमंचावर मतकरींसोबत केलेल्या कामाच्या आठवणी जागवल्या. मतकरींसारखंच वंचितांसाठी काम करत राहीन. वंचितांच्या रंगमंचामधून पुढे वंचितांचा सिनेमा उभा करिन, असे संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केले. कथा लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, पत्रकार, लेखक मुकुंद कुळे, रंगकर्मी संतोष वेरुळकर, चित्र समीक्षक डॉ. संतोष पाठारे, उदयोन्मुख कलाकार - नर्तक नकुल घाणेकर, मतकरींसोबत बालनाट्यात काम करीत व्यक्तिमत्व घडलेला आर्किटेक्ट मकरंद तोरस्कर, प्रायोगिक नाट्य दिग्दर्शक मिलिंद अधिकारी आदींनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.