ठाणे : तलावाचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील मासुंदा तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा नारळ मागील वर्षी वाढविण्यात आला होता. या तलावाला हायटेक लुक देण्यासाठी पालिकेने काचेचा पाथवे तयार करण्याचे निश्चित केले व त्यासाठी सुमारे सहा कोटींचा खर्च करण्याचे निश्चित केले आहे. स्मार्टसिटीच्या निधीतून हे काम मे महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र यातील केवळ एक टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती उघड झाली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी मासुंदा तलाव व सभोवतालचा परिसर हे रम्य प्रेक्षणीय स्थळ होणार आहे. काही दिवसांपूर्वी मासुंदा तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरु झाले आहे. मासुंदा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व पदपथ सुशोभिकरण, अत्याधुनिक नौका विहार, डीजीटल चित्रदर्शन, तलावातील शंकर मंदिराचे सुशोभिकरण, अहिल्यादेवी होळकर घाट, खुला रंगमंच, दत्त घाट (गणेश विसर्जन तलाव), नाना नानी पार्क, सेल्फी पॉइंट, रंगोबापुजी गुप्ते चौक सुशोभिकरण, अत्याधुनिक व आवश्यक विद्युत व उद्यानविषयक विविध कामे करण्यात येणार आहेत. मात्र यातील अनेक कामे आजही शिल्लक आहेत. हेच या तलावाला भेट दिल्यावर निदर्शनास येते.स्मार्टसिटी अंतर्गत या तलावात तरंगता पाथ-वे तयार करण्यात येणार होता. यासाठी ६ कोटी ९९ लाख ६३३ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या स्मार्टसिटीच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली. हे काम मे २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही या कामाकरिता एक इंचभर काचेचा तुकडा बसवलेला नाही. स्मार्टसिटीच्या अलीकडेच झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पाचे केवळ एक टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र कोणते काम झाले हे अद्यापही समजूशकलेले नाही.असा असणार पाथवेस्टेशनवरुन येणारा सॅटीस हा जांभळी नाका येथे खाली उतरण्यापूर्वी तलावाच्या कोपऱ्यावर असलेल्या पाणपोई पासून ते जांभळी नाक्यापर्यंत हा काचेचा पाथवे उभारण्यात येणार आहे. परंतु तलावात कुठेही खोदकाम केले जाणार नाही. केवळ तलावाबाहेर जो फुटपाथ असेल त्याठिकाणी पिलर उभारणीसाठीच केवळ खोदकाम केले जाणार आहे. दीड मीटर रुंद आणि ४०० मीटर लांबीचा हा पाथवे असणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे येथील वृक्षांना बाधा होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.