ठाणे : ठामपाच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये काम करणारे ५० डॉक्टर आणि २०० नर्स यांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री कामावरून काढून टाकल्याच्या आणि पगार कमी केल्याच्या नोटिसा त्यांना रुग्णालयाच्या ग्रुपवर टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे संतापलेल्या डॉक्टर व नर्स यांनी रुग्णालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर आता रुग्णांची सेवा सुरू आहे. दरम्यान, हे प्रकरण अधिक चिघळल्याची चिन्हे दिसत असतानाच ठामपाने तूर्तास कोणालाही कामावर कमी केले जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ठामपाच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये सुरुवातीलाच ओम साई प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने डॉक्टर आणि नर्सची भरती करण्यात आली आहे. त्यानुसार येथे १८० डॉक्टर व ३०० नर्स असे कर्मचारी आहेत. परंतु, आता ठाण्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले असून, रुग्णालयातही रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, अद्याप हे सर्व डॉक्टर्स आणि नर्स आपली सेवा बजावत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री मात्र संबंधित कंपनीने अचानक पगार कमी केल्याच्या, तसेच ५० डॉक्टर आणि २०० नर्सना काढून टाकण्यात येत असल्याच्या नोटिसा दिल्या आहेत. हे सर्व डॉक्टर आणि नर्स शनिवार सकाळपासून रुग्णालयाच्या बाहेर आंदोलनाला बसले असून, त्यांनी काम बंद केले होते. अखेर या आंदोलनाची दखल घेत ठामपातर्फे तूर्तास यातील कोणालाही कामावरून कमी केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
----------
ग्लोबल कोविड सेंटरमध्ये एक हजारांहून अधिक बेड आहेत. परंतु, सध्या १४६ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. त्यातील ४३ रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने या रुग्णांसाठी जेवढा स्टाफ आवश्यक आहे, त्यानुसार तेवढेच कर्मचारी ठेवण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती पुढे येत आहे. परंतु, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी स्वरूपातील कर्मचारी कमी केला जाणार नसल्याचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. असे असताना अचानक २०० नर्स आणि ५० डॉक्टरांना कमी करण्याच्या मुद्द्यावरून हे आंदोलन झाल्याचे दिसून आले आहे.
----------
सध्या कंत्रटी कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार नाही. यासंदर्भात सोमवारी बैठक होणार आहे. त्यात पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा
--------------