ठाणे : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनबरोबरच कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. याशिवाय लसीकरणही सुरू केले आहे. यामुळे ठाण्यातील ग्लोबल कोविड हॉस्पिटलबाहेर लसीकरणासाठी गर्दीचा महापूर उसळला आहेे. विशेषत: ऑनलाइन नोंदणी असतानाही दुपारच्या सत्रातील नागरिकांनाही चक्क १२.३० च्या सुमारास प्रवेश दिल्यामुळे गर्दी झाल्याचेे वास्तव भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी उघड करून याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
ठाणे महापालिकेतर्फे ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइनद्वारे नोंदणी करून लसीकरण करण्यात आले. त्यासाठी प्रत्येकी एक हजार नागरिकांना नोंदणी दिली होती. त्यामुळे शनिवारी व रविवारी सकाळपासून ग्लोबल हॉस्पिटलच्या परिसरात गर्दी उसळली. बाळकूम ते साकेत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू असल्यामुळे केवळ एका मार्गिकेतच फुटपाथवर रांग, रस्त्यालगत नागरिक व पोलिसांची वाहने आणि काही वेळा होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे गोंधळ उडाल्याचे पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
ग्लोबल हॉस्पिटलमध्ये लसीकरणासाठी सकाळच्या वेळी चार तासासाठी प्रत्येकी एक तासाचा टप्पा निश्चित केला आहे. दुपारच्या सत्रासाठी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान प्रत्येकी तासाभराच्या टप्प्यानुसार नोंदणी दिली गेली. मात्र, हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्यांनी सरसकट नागरिकांना प्रवेश दिला. त्यानंतर हॉस्पिटलमधील नोंदणीवेळीही नागरिकांकडील मोबाइल वा एसएमएसनुसार वेळेची तपासणी केली गेली नाही. त्यामुळे रांगेत उभे राहिलेले दुपारच्या सत्रातील शेकडो नागरिक सकाळच्या सत्रातच प्रवेश मिळविण्यात यशस्वी झाले. या ढिसाळ नियोजनामुळे हॉस्पिटलच्या आवारात गर्दी उसळली होती.
इतरवेळी अवघ्या तासाभरात होणाऱ्या लसीकरणाला तब्बल दोन ते अडीच तासांचा कालावधी लागला. दुपारी दीडच्या सुमारास सातव्या मजल्यावर १०० हून अधिक नागरिक एकत्र आले होते. त्यात सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला, अशी तक्रारही पवार यांनी केली आहे. नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेऊन योग्य नियोजन करण्याची मागणी पवार यांनी केली आहे.
--------------------------
पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर प्रवेश गरजेचा !
पासपोर्ट कार्यालयात अर्ध्या तासाचे स्लॉट दिले जातात. त्यानुसार रांगा लावल्या जातात. सद्य:स्थितीत कोरोना संसर्गामुळे वेळेनुसार रांगा शक्य नसल्या, तरी वेळेआधी आलेल्या नागरिकांना थांबविण्याची गरज आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर प्रत्येक तासाच्या स्लॉटनुसारच ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नागरिकांना प्रवेश द्यावा, अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर ग्लोबलमध्ये दिवसभरात दोन हजार नागरिकांचे लसीकरण करण्यापेक्षा ठाण्यातील पाच ठिकाणी प्रत्येकी ४०० नागरिकांचे लसीकरण केल्यास गर्दीचीही विभागणी होईल, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.