ठाणे : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात ग्लोरिअस क्रिकेट क्लबने साईनाथ स्पोर्ट्स क्लबवर अवघ्या दोन धावांनी विजय मिळवत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी सुरुवात केली. ग्लोरिअस क्रिकेट संघाने दिलेल्या ५ बाद १३७ धावांचा पाठलाग करताना साईनाथ स्पोर्ट्स क्लबला २० षटकात ९ बाद १३५ धावा करता आल्या.
बुधवारी या स्पर्धेचा तिसरा दिवस रंगला होता. सेंट्रल मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेतील सामन्यात ग्लोरिअस क्रिकेट क्लबने खराब सुरुवातीनंतर आयरा जाधवच्या नाबाद ६८ धावांच्या खेळीमुळे शतकी धावसंख्या पार केली. आयराने तुफानी फलंदाजी करत ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. आपल्या नाबाद खेळीत आयराने अकरा चौकार मारले. रिया साळुंखेने संघाच्या धावसंख्येत ४६ धावांचे योगदान दिले. निधी घरतने दोन, सीआरा परेरा आणि अंशु पालने प्रत्येकी एक फलंदाज बाद केले. उत्तरादाखल साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या सारा सामंतने ३९ चेंडूत १० चौकारानिशी ५३ धावा करत संघाला विजयाच्या जवळ नेले. पण संघातील इतर फलंदाजांनी हाराकीरी केल्यामुळे साईनाथ स्पोर्ट्स क्लबला पराभव पत्करावा लागला. रिया साळुंखे, करुणा सकपाळने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. दिशा चांडक, आयरा जाधव आणि जान्हवी निगडेने प्रत्येकी एक विकेट मिळवली. फलंदाजी, गोलंदाजीसह दोन झेल पकडून छाप पाडणाऱ्या आयरा जाधवला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक : ग्लोरिअस क्रिकेट क्लब : २० षटकात ५ बाद १३७ (आयरा जाधव नाबाद ६८, रिया साळुंखे ४६, निधी घरत ४-१५-२, सीआरा परेरा २-१३-१, अंशु पाल ४-२५-१) विजयी विरुद्ध साईनाथ स्पोर्ट्स क्लब : २० षटकात ९ बाद १३५ ( सारा सामंत ५३, सिमरन डिमेलो १८, रिया साळुंखे ३-११-२, करुणा सकपाळ ३-१६-२, दिशा चांडक २-१०-१, आयरा जाधव ३-२६-१, जान्हवी निगडे १-१५-१) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : आयरा जाधव.