प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : यंदा सर्वत्र कोरोना महामारीचे सावट असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यास सर्व गणेशोत्सव मंडळांनी ही पाठिंबा दिला आहे. तसेच घरगुती गणेशोत्सव ही अत्यंत सध्या पद्धतीने करण्याचेही भक्तांनी ठरविले आहे. याच धर्तीवर "गो ग्रीन बाप्पा" ही संकल्पना राबविणाऱ्या एका महिला पर्यावरणप्रेमीनी गणेश मूर्तीबरोबर संपूर्ण कुटुंबाला मास्क आणि सॅनेटायझर देण्याचे ठरविले आहे.
अवघ्या काही दिवसांवर श्री गणेशाचे आगमन होणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबर घरगुती गणेशोत्सवही अगदी साध्या पद्धतीने आणि कमीत कमी लोकांमध्ये साजरा करण्याचे गणेश भक्तांनी ठरविले आहे. मंडळांनीही आपापल्या पातळीवर सुचनावली तयार केली आहे. गणेशमूर्तिकार ही ऑर्डर्सप्रमाणे मूर्ती तयार करीत आहेत. लाल मातीच्या मूर्तीचे संकल्पनाकार ठाण्यातील पर्यावरणस्नेही सोनाली कुंभार यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मूर्ती व त्यासोबत जास्वंद किंवा बेलाचे रोप मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे मोफत घरपोच देण्याचे नियोजन केलेच आहे. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्येक बाप्पाच्या मूर्तीसोबत प्रत्येक कुटुंबाकरिता मास्क आणि सॅनिटायझर ही देण्याचे ठरवले आहे. बाप्पाची ही मूर्ती घरातच विसर्जन करता येणार असल्याने भक्तांना मूर्ती घेण्यासाठी किंवा विसर्जन करण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. या संकल्पनेस खूप प्रतिसाद मिळतअसून मागील वर्षीपेक्षा दुप्पट बुकिंग यावर्षी झाल्याचे सोनाली यांनी सांगितले. तसेच यावर्षी मुंबई, ठाणेसह पुण्यातही गो ग्रीन बाप्पा भक्तांना मिळणार आहे. आतापर्यंत गो ग्रीन बाप्पाच्या 250 मूर्ती बुक झाल्या आहेत. माती आणि वाहतूक खर्च वाढल्याने यंदा 200-300 रुपयांनी या मूर्तींची किंमत वाढली आहे. 10 इंच ते 22 इंचापर्यंत गो ग्रीन बाप्पा उपलब्ध आहे.