अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज, ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकित त्यांनी आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत ठाणे, कल्याण, नवीमुंबई च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा असे सांगितले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच मराठा आरक्षण, आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांचे नेते शहरात दौरे करून पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. याशिवाय, सर्वच राजकीय पक्षांनी कोकण पदवीधर निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणी करण्यात येत आहे. मनसेकडूनही अशाप्रकारची तयारी सुरू आहे. असे असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे गुरूवारी सकाळी ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले आहेत. नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ते शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली. यामध्ये आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तयारीचा आढावा घेतला असल्याची सुत्रांनी दिली. याशिवाय मराठा आरक्षण बाबत पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेतली, तसेच आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत कश्या प्रकारे तयारी करावी लागेल या बाबत मार्गदर्शन केल्याचेही दिसून आले.