लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. यामुळे बकरी ईदनिमित्त प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कोणतीही शिथिलता नाही. त्यास अनुसरून ईदची नमाज मशीद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. मुस्लिमबांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी आॅनलाइन पद्धतीने अथवा दूरध्वनी करून ती खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.