भिवंडी : ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर असलेल्या भिवंडी तालुक्याच्या गोदाम पट्ट्यात आगीचे सत्र सुरूच असून मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पुन्हा दुमजली असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे सुंगधी धूप जळून खाक झाले. ही घटना भिवंडी तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कापऱ्याबाबा कम्पाऊंडमधील प्रीमियर ट्रेडर्सच्या पहिल्या मजल्यावरील सुंगधी धूप साठवून ठेवलेल्या गोदामात घडली.
पूर्णा ग्रामपंचायतीच्या बस स्टॉपसमोरील कापºया बाबा कम्पाऊंड येथील भरतभाई यांच्या मालकीच्या प्रीमियर ट्रेडर्सच्या पहिल्या मजल्यावरील गोदामात डिंक ,मेण व पूजेसाठी वापरले जाणारे सुगंधी धूप यांचा मोठया प्रमाणावर साठा करून ठेवला होता. त्या ठिकाणी मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक आग लागली. धुराचे लोळ बाहेर पडू लागताच या आगीची माहिती स्थानिकांनी भिवंडी अग्निशमन दलास दिली असता प्रभारी अधिकारी दत्ता साळवी यांनी दोन गाड्यांसह घटनास्थळी पोहचले. मात्र आगीची व्याप्ती अधिक असल्याने त्यांनी ठाण्यातील अग्निशमन दलालाही पाचारण केले.
आगीच्या ठिकाणी पहिल्या मजल्यावरील गोदामातून फक्त धूर दिसून येत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पूर्णा ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा खंडागळे यांनी वरिष्ठ लिपिक विनायक पाटील यांना स्थानिक ग्रामस्थांकडून जेसीबी व खाजगी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यास सांगून जेसीबीच्या मदतीने गोदामाच्या भिंती तोडल्यानंतर आगीचे लोळ बाहेर पडले. अथक प्रयत्नानंतर तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. नारपोली पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.इमारतीचे बांधकाम कमकुवतया आगीवर दुपारी पावणे बाराच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलास यश मिळाले. ही आग इतकी भयानक होती की, गोदामाच्या इमारतीचे दोन्ही मजले कोसळून पडले. त्यामुळे इमारतीचे बांधकाम कमकुवत असल्याने ती कोसळली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.