भिवंडी : भिवंडी परिसरात गोदाम आणि निवासी इमारतींची जोमाने बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे फूटभर जागेची भांडणे, वाद पोलीस ठाणे किंवा न्यायालयात पोहोचत आहेत. याला खारबाव येथील ज्ञानेश्वर ऊ र्फ ओम मुकादम अपवाद ठरले आहेत. मुकादम यांनी खारबाव ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाण्याची टाकी उभारण्यासाठी मालकीची जमीन दान केली आहे.खारबांव ग्रामपंचायत क्षेत्रात लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी दोन पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र, त्यांची क्षमता अपुरी पडत असून पाचकुडावाडी, सीताईनगर, मानकापा, गणेशनगर या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना पाणी मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीने या भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडून मान्यता मिळवली आहे. मात्र, त्यासाठी सरकारी जमीन मिळत नव्हती. त्यामुळे टाकीचे बांधकाम रखडले होते.ही बाब सिव्हिल इंजिनीअर असलेल्या मुकादम यांना समजताच त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क करून पाण्याच्या टाकीसाठी लागणारी जमीन देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, त्यांनी स्वमालकीची गाणे येथील फिरिंगपाडा रोडवर असलेली दोन गुंठे जमीन पाण्याच्या टाकीसाठी दान केली.जागेची मोजणी करून ग्रामपंचायतीने ती ताब्यात घेतली आहे. याप्रसंगी सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच अशोक पालकर, सामाजिक कार्यकर्तेरमाकांत पाटील आदी उपस्थित होते.
देवमाणूस! पाण्याच्या टाकीसाठी दान केली जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 10:59 PM