लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : भार्इंदर महापालिकेच्या गोडदेव व मांदली तलावातील मासे मोठ्या संख्येने मृत होऊ लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या तलावात मोठया संख्येने मूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने घातक रासायनिक रंग, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या प्रदूषणामुळे दरवर्षी मासे मरत असताना महापालिका मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. भार्इंदर पश्चिमेस मांदली तलाव आहे. तलावाच्याजवळच पालिकेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरभवन ही इमारत असून येथे उद्यान अधीक्षक, शिक्षण विभाग, प्रभाग समिती कार्यालय, परिवहन विभाग, वाचनालय-अभ्यासिका तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कार्यालय आहे. या तलावातील तसेच पूर्वेच्या गोडदेव तलावातील मासे सध्या मरू लागले असून मोठ्या संख्येने मेलेले मासे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. वास्तविक उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात मूर्ती कशा असाव्यात व विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करावा असे स्पष्ट नमूद आहे. पण मीरा भार्इंदर महापालिकेला पर्यावरणाशी काही सोयरसूतक नाही. दरवर्षी तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते.
जलप्रदूषणाने गोडदेव, मांदली तलावातील मासे मृत
By admin | Published: May 25, 2017 12:04 AM