ठाणे : कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात खूप गोंधळ उडाला होता. कोरोनाच्या उपचाराविषयी सरकारकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. परंतु कोरोना रुग्ण कसा असतो, हे कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे गोंधळ आणि रुग्णाची काळजी यात मी अडकले होते. वरिष्ठांनी मनोधैर्य वाढविले, तसे या संकटाशी दोन हात करण्याची ऊर्जा मिळाली. कोरोना वॅार्डमध्ये जाताना एखाद्या युद्धाला जात असल्यासारखे वाटत होते. या युद्धाशी लढणारे आम्ही जणू सैनिक असून, हे युद्ध कोणत्याही परिस्थीतीत जिंकायचेच, अशा भावना मनात यायच्या. आपल्या हातून अनेक रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी पोहोचले, याचे आज समाधान वाटते, अशी भावना सिव्हील रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. वंदना पाटील यांनी व्यक्त केली.
डॉ. पाटील या कोरोना काळात आपल्या घरापासून तब्बल तीन महिने दूर होत्या. रुग्णालयात दाखल झालेल्या पहिल्या कोरोना रुग्णावर त्यांनी उपचार केले. रुग्ण सेवा हीच इश्वर सेवा या उक्तिला त्या खऱ्या उतरल्या. त्यांचे अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, आम्ही एका कुटुंबासारखे काम करीत होतो. त्यामुळे एकमेकांचे सांत्वन करायचो. बाहेरच्या जगाचा विसर पडला होता. कॅलेण्डर तर माहीत नव्हते. वार, तारीख लक्षात राहात नसत. सण - उत्सव कधी आले, हे कळलेही नाही. डोळ्यांसमोर एकच ध्येय होते. सिव्हील सर्जन डॉ. कैलाश पवार यांनी जेवणाची, राहण्याची आणि वाहनाची सोय केली होती. त्यामुळे आमच्यावरचा ताण कमी झाला होता. हळूहळू दिवस पुढे जात होते, रुग्णांची संख्या वाढत होती. इतर रुग्णालयांत
बेडही उपलब्ध नव्हते, अशा वेळी आम्ही कितीही रुग्ण पाठवा, त्यांच्यावर उपचार करायला तयार आहोत, या भूमिकेत होतो.
-----------------------------------------
जुलै ते सप्टेंबर सर्वात कठीण काळ
सुरुवातीला जो गोंधळ, दडपण आणि भीती होती ती अनुभवाने नाहीशी होत होती, मनही खंबीर होत होते. हॉस्पिटलमध्ये गेले की, पीपीई कीट घालायचे आणि काढले की, थेट गेटबाहेर पडायचे, असा आमचा दिनक्रम होता. सुरुवातीच्या काळात हॉटेलमध्ये निवासव्यवस्था होत नव्हती, तेव्हा घरी जायला लागायचे. ते दिवस मात्र मी तणावात जगले. राहण्याची सोय झाली, तेव्हा आपण घरच्यांपासून दूर आहोत, या विचाराने दिलासा मिळाला होता. कारण ते कुटुंब आणि सोसायटीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले होते. जुलै ते सप्टेंबर हा काळ सर्वात कठीण गेला. डिसेंबर महिन्यात घरी आले. आता काळजी मिटली आहे. संकटातून शिकत गेले. आपल्या हातून रुग्ण बरे होऊन जातात, हाच एक दागिना आहे, असे आता वाटत आहे.