ठाणे/डोंबिवली : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला सोनेखरेदी जोरात होईल, ही अपेक्षा ठाण्यात फोल ठरली, तर डोंबिवलीत ती काही अंशी खरी ठरली असली, तरीही आता सराफांची भिस्त ही उद्याच्या पाडव्यावर आणि परवाच्या भाऊबीजेवर आहे. गेले दोनतीन दिवस फटाक्यांचा अत्यंत मंदावलेला जोर लक्ष्मीपूजनाला वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दरवर्षी दिसणारा फटाके उडवण्यातील उन्माद यंदा अजिबात दिसला नाही. काही किरकोळ अपवाद वगळता तुरळक फटाके फुटत होते. मात्र, रात्री ८ ते १० या दोन तासांतच फटाके उडवण्याची डेडलाइन काही पाळली गेली नाही. सायंकाळी लक्ष्मीपूजनानिमित्त चोपडापूजन होताच फटाके फुटले.लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधलाठाणे : दिवाळीनिमित्त बुधवारी शहराच्या विविध भागांत लक्ष्मीपूजनाचा सायंकाळचा मुहूर्त साधून चोपडापूजन केले. तसेच घरोघरीही लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधला गेला. सायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत कमी आवाजाच्या फटाक्यांची आतषबाजी करून व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजनाचा आनंद लुटला. परंतु, यंदा न्यायालयाच्या आदेशाचे परिणाम लक्ष्मीपूजनावर दिसून आले. दिवाळीत यंदा दागिन्यांसह वाहने आणि गृहखरेदी मंदावल्याचे दिसून आले.बुधवारच्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा सायंकाळी ६ वाजता असल्याने या मुहूर्तावर स्टेशन परिसर, नौपाडा भागातील व्यापाºयांनी चोपडापूजन केले. परंतु, मुहूर्तावर फटाके फोडण्याचे प्रमाण यंदा कमी दिसून आले. बुधवारीसुद्धा सकाळपासून बाजारात लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. स्टेशन परिसर ते जांभळीनाकापर्यंत गर्दीचे चित्र दिसत आहे. ज्वेलर्सच्या दुकानातूनही गर्दी पाहावयाला मिळाली. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकांनी दागिन्यांची खरेदी केली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे पूजन करायचे असल्याने धनत्रयोदशीच्या दिवशीच सोन्याच्या दागिन्यांची खरेदी झाली होती. आज मात्र तसे काही झाले नाही. ‘दिवाळीत दसºयापेक्षा दागिन्यांची खरेदी मंदावली होती. धनतेरसवगळता इतर दिवशी दागिन्यांची फारशी विक्री झाली नाही,’ असे ठाणे ज्वेलर्स असोसिएशनचे कमलेश जैन म्हणाले.सराफांची भिस्त आता आजच्या पाडव्यावरडोंबिवली : सोन्याचा भाव वाढलेला असतानाही हौसेला मोल नसल्याने ठाणे जिल्ह्यातील अलंकार, दागदागिनेप्रेमी ग्राहकांनी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून चांगली खरेदी केली. मात्र, बुधवारपेक्षाही गुरुवारी पाडव्याला आणि शुक्रवारच्या भाऊबीजेला आणखी चांगली खरेदी होईल, अशी सराफा व्यावसायिकांची अपेक्षा आहे.दसºयाला सोने महागले असले, तरीही मुहूर्ताची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. सप्टेंबर महिन्यात गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तालाही ग्राहकांनी सोनेखरेदी केली. दसºयाला ३१२७ रुपये प्रतिग्रॅम भाव होता, तर बुधवारी दिवाळीत ३१३२ प्रतिग्रॅम भाव होता. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत गेल्या दीड महिन्यात सोन्याचे दर दीड हजारांनी वाढले, तरीही ग्राहकांनी मात्र छोट्या प्रमाणावर का होईना, पण पारंपरिक पद्धतीने सोनेखरेदीला प्राधान्य दिल्याची माहिती आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे संचालक नितीन कदम यांनी दिली.ग्राहकांची मानसिकता बदलत असून आता दिवाळी आणि पुढील महिन्यात लग्नमुहूर्त असल्याने बाजारात सोनेखरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढेल. दसरा आणि दिवाळीत निश्चितच चांगली खरेदी झाली असून भविष्यात सराफ व्यवसायाला आलेली मरगळ नाहीशी होणार असल्याचे आशादायी चित्र असल्याचे कदम म्हणाले.दसºयासारखेच आताही कर्णफुले, पैंजण, कानातल्या रिंगा, बांगड्या आदी छोट्या खरेदीबरोबरच मंगळसूत्र आणि काही प्रमाणात पारंपरिक हार, तोडे, गंठण अशा सोन्याच्या खरेदीचे ग्राहकांना आकर्षण आहे. लक्ष्मीपूजनाला मुहूर्ताची तर पाडव्याला परंपरेप्रमाणे खरेदी करून सोन्यात गुंतवणूक होईल, असे चित्र असल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे डोंबिवली, ठाणे, कल्याणमधील प्रख्यात सराफ व्यावसायिक वाघाडकर ज्वेलर्सचे संचालक प्रफुल्ल वाघाडकर म्हणाले. गृहिणींपेक्षाही कर्णफुले, रिंगा आणि सोन्याची चेन असे दागिने खरेदी करण्याकडे तरुणींचा कल असल्याचे वाघाडकर म्हणाले.वेळेचे बंधन झुगारलेकल्याण-डोंबिवलीतही सायंकाळी चोपडा पूजन होताच व्यापाºयांनी फटाके फोडून वेळेच्या बंधनाचे उल्लंघन केले. मात्र, दरवर्षी या दोन्ही शहरांत जाणवणारा फटाक्यांचा दणदणाट यंदा तुलनेने कमी होता. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.ठाण्यात फटाक्यांचा आवाज मंदावला- जितेंद्र कालेकरठाणे : सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्यास परवानगी दिल्यानंतर पोलिसांनीही त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधितांना दिले होते. या पार्श्वभूमीवर ठाण्यात दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांचा आवाज यंदा मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३४ पोलीस ठाण्यांपैकी एकाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.वसुबारसपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणात धनतेरस, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांचा आवाज पहाटेपासूनच सुरू होतो. नरकचतुर्दशीला अभ्यंगस्रानानंतर पहाटेच फटाके वाजवण्याचीही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यानंतर, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी तसेच नोकरदार मंडळी सायंकाळी ७ ते ११ या दरम्यान हमखास फटाके वाजवतात. यंदा मात्र न्यायालयाच्या निर्बंधामुळे पोलिसांनीही कारवाईसाठी कंबर कसल्यामुळे अनेकांनी फटाके न वाजवण्यातच शहाणपण ठेवले. काहींनी फटाके वाजवणारच, अशी री ओढली. पण, ही टक्केवारी अगदी नगण्य होती. बहुतांश मंडळींनी न्यायालयाचा मान राखल्याचे पाहायला मिळाले. ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांतील ३४ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील ३४ गस्ती पथकेही अशा फटाके वाजवणाºयांवर नजर ठेवून होती. पण, नियमांचे उल्लंघन करून फटाके वाजवणारे कुणीही आढळले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. एरव्ही, नौपाड्यासारख्या ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी फटाके फोडणाºयांची संख्या मोठी आहे. पण, यंदा तो आवाज जाणवलाच नाही. त्यामुळे कारवाई किंवा गुन्हा दाखल होण्याचा प्रश्नच नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात फटाके विहित वेळेमध्ये वाजवण्यासाठी आवाहन केले होते. त्यासाठी विशेष गस्ती पथकेही नेमली होती. नागरिकांनी पोलीस, सामाजिक संस्था आणि न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यामुळे आयुक्तालयात बुधवारपर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नव्हता.- सुखदा नारकर, जनसंपर्क अधिकारी,पोलीस आयुक्तालयजागृतीचा सकारात्मक बदलयंदा फटाक्यांच्या आवाजाचे प्रमाण बºयापैकी कमी झाले आहे. सकाळच्या वेळी सर्वसाधारण ५० ते ७० हे आवाजाचे डेसिबल एरव्ही असते. आता अगदी नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही आवाजाची ही पातळी नौपाडा, हिरानंदानीसारख्या भागात ५५ ते ६५-७० अशी नोंदली गेली. ध्वनिप्रदूषणाविरुद्ध केलेल्या जनजागृतीचाही हा सकारात्मक बदल आहे. फटाक्यांचा आवाज कमी होण्याचे प्रमाण यंदा ३० ते ४० टक्के आहे. समाजमन बदलत आहे. आणखी बदल अपेक्षित आहे.- डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते, ठाणे
सोनेखरेदी आणि फटाके झाले फुस्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 3:16 AM