ठाणे : साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त. या मुहूर्तावर सोने-चांदीच्या वस्तू खरेदी करण्याची परंपरा पूर्वापार असलेली प्रथा आजही कायम आहे. मात्र, मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे सोन्याच्या व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यात येणाऱ्या सोने-चांदीच्या वस्तूंमधून कोट्यवधींची उलाढाल होत असते. परंतु, यंदा कोरोनाचे सावट आणि सरकारच्या कठोर निर्बंधांमुळे सराफांना व्यवसायावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.
राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय वगळता इतर दुकानदारांसोबत रेडिमेड कपड्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची दुकाने, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांच्यासहित सोन्याच्या पेढ्याही बंद केल्या आहेत. तर शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत वीकेंड टाळेबंदी लागू केली आहे. त्यात मंगळवारी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीसाठी नागरिक सोन्याच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करीत असतात. मात्र, यंदाच्या वर्षी सराफा बाजार बंद असल्याने यंदाही लाखमोलाचा व्यवहार पूर्णपणे ठप्प राहणार आहे. ठाणे शहरात सध्याच्या घडीला ६५० सोने-चांदीची दुकाने आहेत. परंतु, गुढीपाडवा असतानाही टाळेबंदीमुळे लोकांना घराबाहेर पडताही येत नाही आणि दुकाने उघडण्यास मनाई असल्याने सध्या बाजारात शुकशुकाट आहे.
...
आताच्या क्षणाला लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. तसेच छोट्या दुकानदारांचादेखील सरकारने विचार करावा. कठोर निर्बंधांमुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही दुकान बंद ठेवण्याची वेळ सोने-चांदी दुकानदारांवर आली आहे. त्यामुळे सराफांना चांगलाच फटका बसला आहे.
- कमलेश जैन, अध्यक्ष, ठाणे ज्वेलर्स असोसिएशन